Satara Dcc Bank Election  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Dcc Bank Election : सातारा जिल्हा बॅंकेत भाजपचा ठरणार बिग ब्रदर्स : 11 जागा लढवण्याची शक्यता, शिवसेना-राष्ट्रवादीला इतक्या जागा मिळणार

Mahayuti Seat Sharing : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुतीतून लढविण्याचे निश्चित झाले आहे. 21 जागांपैकी भाजपला 11 आणि शिवसेना-राष्ट्रवादीला 10 जागा मिळण्याची शक्यता असून जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 29 September : सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचे निश्‍चित केले आहे. बॅंकेच्या 21 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 11, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 10 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, जागावाटपात सर्वाधिक वाटा कोणाचा, यावरून महायुतीत सरस कोण? हे ठरणार असल्याने भाजप, राष्‍ट्रवादी आणि शिवसेनेच्‍या जिल्ह्यातील प्रमुख नेत्‍यांच्‍या बैठकांवर बैठका सुरू आहेत. विशेषतः सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पुन्हा एका किंगमेकरच्या भूमिकेत राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्हा बॅंकेत यापूर्वी सर्वाधिक संचालक हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचारांचे होते. त्या खालोखाल रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार नितीन पाटील, मंत्री मकरंद पाटील यांच्या विचारांचे होते. आता यावेळी भाजपचे बॅंकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी पक्षाकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढविले जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्‍यांनीच अद्याप आपले पत्ते ओपन न केल्याने इच्‍छुकांनी आपले देव पाण्‍यात ठेवले आहेत.

सद्यःस्‍थितीत सर्वाधिक मतदारसंख्या सातारा, कऱ्हाड, फलटण आणि खटाव तालुक्यांत आहेत. ज्या तालुक्यात मते जास्त तेथे अधिक जागा, असे सूत्र ठरल्‍यास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील या नेत्यांच्या वाट्याला सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांचा सर्वाधिक कल या नेत्यांकडेच असल्याचे दिसून येते.

भाजपमध्येही रस्सीखेच

महायुतीच्या माध्यमातून निवडणूक झाल्यास एकूण २१ जागांपैकी भाजपकडून अकरा जागांची मागणी होण्‍याची शक्‍यता आहे. यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, डॉ. अतुल भोसले यांच्यामध्ये जागांचे वाटप होण्‍याची शक्‍यता आहे.

नेतेमंडळींचा कस लागणार

खासदार उदयनराजे यांचेही मतदार यंदा वाढले असल्याने त्यांच्याकडून दोन जागांची मागणी होण्‍याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंत्री गोरे यांच्याकडूनही दोन ते तीन जागांची मागणी झाली, तर उर्वरित नेत्यांना एक-एक जागा देतानाही नेत्‍यांचा कस लागणार आहे.

शिवेंद्रराजे पुन्हा ठरणार वरचढ

आणखी दोन दिवस बैठकांचे सत्र चालणार असले, तरी त्यामध्ये सोसायटी वगळता उर्वरित पाच मतदारसंघ आणि राखीव पाच जागा असे दहा जागांचे वाटप होणार आहे. यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे यावेळीही पाच जागा ताब्‍यात ठेवून आपला वरचष्‍मा राखणार का? याची उत्सुकता आहे.

जागा वाटपाचा तिढा

भाजपने ११ जागा घेतल्‍यास उर्वरित दहा जागांमध्ये महायुतीतील राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील, मंत्री मकरंद पाटील, शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्यात वाटप होण्याची शक्यता आहे, तर यामध्‍ये राखीव पाच जागांच्‍या वाटणीतील तिढा महायुतीतील नेते कसे सोडवणार? ही उत्‍सुकता राहणार आहे.

जिल्हा बॅंकेचे मतदार

२०१९ एकूण मतदार

९६३ सोसायटी प्रतिनिधी

३७९ नागरी बॅंका व पतसंस्था

३४३ औद्योगिक, विणकर- मजूर संस्था

२९५ गृहनिर्माण आणि दूध संस्था

२९ कृषी प्रक्रिया मतदारसंघ

१० खरेदी-विक्री मतदारसंघ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT