Wai, 10 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत वाई सोसायटी मतदारसंघातून दीपक ननावरे यांचा अर्ज बाद झाल्याने खासदार नितीन पाटील यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. आता खरेदी- विक्री संघ मतदारसंघातून मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह विश्वासराव निंबाळकर यांचा अर्ज आहे. निंबाळकरांचा अर्ज मागे घेण्यात पाटील बंधू यशस्वी झाल्यास मंत्री पाटीलही मागील निवडणुकीप्रमाणे बिनविरोध होतील. यासोबतच महिला राखीव व नागरी बॅंका, पतसंस्थेतून सुरभी भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे.
किसन वीर यांच्यानंतर वाई तालुक्याच्या सहकार आणि राजकारणावर माजी खासदार (स्व.) लक्ष्मणराव पाटील यांचा प्रभाव राहिला आहे. त्यांचा वारसा त्यांचे पुत्र मंत्री पाटील व खासदार पाटील यांनी पुढे चालू ठेवला आहे. पाटील बंधूंच्या या वर्चस्वाला शह देण्यासाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने रणनीती आखली आहे. मात्र, नितीन पाटील यांचे सहकार क्षेत्रातील काम व अभ्यास असल्याने त्यांना आव्हान देणे, भाजपला सोपे नाही.
यापूर्वीही जिल्हा बँक निवडणुकीत मदन भोसले यांच्या गटाची मदार नेहमीच राष्ट्रवादीतील नाराजांवर राहिली आहे. त्यामुळे पाटील बंधू यांना पक्ष व गटाअंतर्गत आव्हान देण्याचा झालेला प्रयत्न या वेळी यशस्वी ठरला नाही. उलट तालुक्यातून बिनविरोधकडे वाटचाल करून त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
मागील निवडणुकीत वाई तालुका सोसायटीतून नितीन पाटील, तसेच खरेदी-विक्री मतदारसंघातून मकरंद पाटील बिनविरोध झाले होते. त्यानंतर नितीन पाटील बँकेचे अध्यक्ष झाले. या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून नितीन पाटील व मकरंद पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्यासमोर भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक ननावरे यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या मदतीने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला; पण तो यशस्वी ठरला नाही.
दरम्यान, सत्यजित सुरेश वीर यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. कृषी पणन, शेतमाल प्रक्रिया व खरेदी विक्री मतदारसंघातून मकरंद पाटील यांच्या विरोधात माजी संचालक विश्वासराव निंबाळकर (आदर्की खुर्द, ता. फलटण) यांचा अर्ज आहे.
माजी आमदार मदन भोसले यांची कन्या भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्या डॉ. सुरभी भोसले यांनी महिला राखीव आणि नागरी सहकारी बँक व पतसंस्था मतदारसंघातून अर्ज भरलेला आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून त्या प्रथमच सहकार क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही प्रवर्गातून उमेदवारीसाठी जिल्ह्यातील मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली आहे.
काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षा अल्पना यादव यांनीही महिला राखीवमधून अर्ज भरलेला आहे. स्थानिक पातळीवर मदन भोसले यांच्यासोबत त्या राजकारणात सक्रिय असतात. आता राजकीय सत्तेचा वापर करून मंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार मदन भोसले हे या निवडणुकीत आपला प्रभाव कसा टाकणार, हे महत्त्वाचे आहे. नितीन पाटील यांचा बिनविरोधचा मार्ग सुकर होणे, हे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी दिलासा देणारे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.