

Satara, 09 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल साताऱ्यात त्यांचा आज सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भावूक झाले होते. तसेच, सातारा डीसीसी बॅंकेसाठी या वेळी अर्ज भरणार नव्हतो, असे बॅंकेचे सीईओ डॉ. राजेंद्र सरकाळे यांना सांगितले होते, असा गौप्यस्फोटही खासदार भोसले यांनी केला.
ते म्हणाले, मी कधीही पदाला आणि सत्तेला हापापलेला माणूस नाही. खासदारकीचा राजीनामा देणारा हा उदयनराजे आहे, त्यामुळे जिल्हा बँकेचे पद माझ्यासाठी काही विशेष नाही. नगरसेवकपदापासून सुरू झालेल्या माझ्या सामाजिक व राजकीय प्रवासात आमदारकी आणि खासदारकी मिळाली, पण मी कधीही डगमगलो नाही किंवा खचलो नाही. सत्तेच्या माध्यमातून नव्हे, तर लोकांची सेवा करण्याच्या एकमेव भावनेतून मी आज या बँकेत आलो आहे.
सहकारातील सर्वाधिक ज्ञान लक्ष्मण कडव यांना आहे. त्यांनी अर्ज भरला होता, पण तुम्ही बँकेत असणे गरजेचे आहे, असे मी मानतो. डी. के. पवार यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. बॅंकेचे सीईओ डॉ. राजेंद्र सरकाळे यांना सांगितले होते की, मी अर्ज भरत नाही; पण जर भत्ता वाढवून देणार असाल तर अर्ज भरतो. बँकेचा मला मिळालेला पहिला भत्ता मी आजही आठवण म्हणून जपून ठेवला आहे, अशी आठवणही उदयनराजेंनी सांगितला.
ते म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षित वर्गाची प्रगती व्हावी, भावी पिढीचा उत्कर्ष व्हावा, हाच सहकार चळवळीचा मूळ पाया आहे. महाराष्ट्रात ही चळवळ सर्वाधिक रुजली आणि अनेक दिग्गजांनी या बँकेचे नेतृत्व केले. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केल्यामुळेच ही बँक टिकून आहे. परंतु, यात राजकारण आणले गेले तर मूळ हेतू बाजूला राहून संस्थेची वाताहत होते.
छत्रपतींच्या घराण्याची एक उज्ज्वल परंपरा आहे आणि त्या परंपरेला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. ३६५ दिवस तुम्ही केव्हाही हाक मारा, मी तुमच्या सेवेत हजर असेन. कुटुंबातील तरुण-तरुणींनी प्रगतीची नवी उंच गाठली पाहिजे, हाच माझा हेतू आहे. माझ्यावर खोडसळ तरुणांनी आणि जनतेने अत्यंत मनापासून प्रेम केले आहे. तुम्ही दिलेल्या या अफाट प्रेमाचे शब्दात वर्णन करता येत नाही, असेही उदयनराजेंनी नमूद केले.
जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जावेच लागते. नाना पाटेकर यांच्याशी माझे कॉलेजच्या काळापासून संबंध आहेत. मी नक्कीच भरपूर जगणार आहे आणि जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत अडीअडचणीला कधीही कमी पडणार नाही. पदे येतात आणि जातात, त्याचा मी विचार करत नाही. तुमचे हेच प्रेम आयुष्यभर असेच राहो, असेही त्यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.