Satara District Bank Election; Ranjitsinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara District Bank : साताऱ्यात महायुतीत ठरलं काही, घडलं वेगळंच! अध्यक्ष निवडीनंतर भाजपच्या माजी खासदारांनी व्यक्त केली खंत

Satara Mahayuti Conflict : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची नियुक्ती झाल्यानंतर भाजपमधून आता नाराजीचे सुर उमटू लागले आहेत.

Aslam Shanedivan

Satara News : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण विराजमान झाले आहेत. या निवडीत भाजपला डावलण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामागे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या गोंधळाची पार्श्वभूमी असल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. विशेष म्हणजे, मंत्री शंभूराज देसाई यांच्या एका विधानाने या चर्चेला एकप्रकारे दुजोराच मिळाला आहे.

दरम्यान, एकीकडे सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, असा दावा करणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आता बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडीनंतर अध्यक्ष महायुतीचाच झाला, अशी सावध भूमिका घेत जयकुमार गोरे यांनी आपल्या आधीच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे.

मात्र, वरिष्ठ पातळीवर ठरल्याप्रमाणे जिल्हा बँकेत अंमलबजावणी झाली नाही, अशी खंत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीतील बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भातील घडामोडी भाजपच्या चांगल्याच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व नेत्यांनी सबुरीने घ्यावे, असा सल्ला देतानाच या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर ठरल्याप्रमाणे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाबाबत अंमलबजावणी झाली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

तसेच, फलटण आणि खंडाळ्यातील अपयशाची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारत असून, जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनीही ती स्वीकारावी, असे मत त्यांनी मांडले. जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराज देसाई हे तिघेही राज्याचे मंत्री आहेत. त्यांच्या आपापसांतील वादाचा त्रास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होतो, याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असे निंबाळकर म्हणाले. आता निवडणुकीतील कटुता आणि 'जखमा' विसरून दुष्काळाचा सामना करण्यासाठी तसेच आगामी निवडणुकांसाठी महायुती म्हणून एकत्र काम करण्याची वेळ आली असल्याचे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील-उंडाळकर अध्यक्षपदी आणि शिवसेनेचे दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी विराजमान होताच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या फॉर्म्युल्याबाबत झालेल्या चर्चेत आपण कधीच नव्हतो. महायुतीच्या चर्चेतही आपण सहभागी नव्हतो. त्यांच्यात नेमके काय ठरले, हे शिवेंद्रराजे यांनाच माहिती आहे, असे सांगत त्यांनी आपली नाराजी लपवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर 'कुठलीही निवडणूक अंतिम नसते', असे म्हणत 'आगे आगे देखो होता है क्या' असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, जयकुमार गोरे यांच्या या विधानाचा अर्थच त्यांना समजला नसल्याचा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला. एवढेच नाही, तर काही जखमा वरवर बऱ्या झाल्यासारख्या दिसतात; मात्र त्या लवकर बऱ्या होत नाहीत. कदाचित त्या खोलवर असतात. जालीम औषध घेतल्यावरच त्या बऱ्या होतात, असे सांगत देसाई यांनी सूचक इशाराही दिला. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीतील राजकीय धुसफूस वाढल्याचे चित्र आहे. भाजपला डावलल्याची नाराजी, जयकुमार गोरेंची बदललेली भूमिका आणि शंभूराज देसाईंच्या सूचक विधानामुळे साताऱ्यातील महायुतीच्या राजकारणात आगामी काळात आणखी कोणते नवे वळण येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT