Ramraje Naik-Nimbalkar, Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : 'जिथे ताकद तो मतदारसंघ आमचाच'; अजितदादा गटाने लोकसभेचे फुंकले रणशिंग

Mangesh Mahale

Satara : सातारा जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात अजितदादा गटाची पहिली बैठक झाली. बैठकीत अजितदादा गटाने लोकसभेचे रणशिंग फुंकले."सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, पक्ष संघटन मजबूत आहे. महायुतीत लोकसभेच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच होईल. माढा असो की सातारा जिथे आमची ताकद आहे. तो मतदारसंघ आम्ही मागणार आहोत," असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजितदादा गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्यात व्यक्त केले.

बैठकीनंतर आमदार रामराजे नाईक निंबाळकर, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संख्याशास्त्रानुसार साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दावा का करत नाही. त्याचबरोबर शरद पवार गट हा सातारा लोकसभा ताकदीने लढणार आहे, मग साताऱ्यात लोकसभेला आपला उमेदवार कोण असेल यावर रामराजे निंबाळकर म्हणाले, "न्यायिक बाबीवर मला प्रश्न विचारू नका, मी त्यावर उत्तरे देऊ शकत नाही. आमचे काय सुरू आहे, त्यावर विचारा. दुसऱ्या पक्षात काय सुरू आह ते विचारू नका."

ते म्हणाले, "साताऱ्यात राष्ट्रवादीचे भवन हे ट्रस्टच्या ताब्यात असल्याने आम्ही त्यावर दावा करू शकत नाही. आमची ताकद जी आहे, ती आम्हाला एकत्र करायची आहे, याचे संघटन करून जिल्ह्यात पक्ष वाढवावा लागणार आहे. आज सातारा दूध संघाच्या जुन्या कार्यालयात आम्ही बैठक घेतली आहे. आता तुम्हीच कार्यालयाचं बारसं घाला."

"जिल्ह्यातील पक्षाचे संघटन कायम राहील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपाच्या अनुषंगाने महायुतीची बैठक झाली नाही. हा प्रश्न राज्याचा आहे. तीन पक्ष राज्यात ४८ जागा एकत्रितपणे लढवणार आहे. जिथं आमची ताकद जास्त असेल तिथं आम्ही तिकिटाची मागणी करणार आहे, मग सातारा असो की माढा. पक्षाने मला संधी दिली तर मी सरपंच पदाची निवडणूकसुद्धा लढायला तयार आहे," असे ते म्हणाले.

"आमचे आता दुष्काळावर लक्ष आहे. मी आजपर्यंत एवढे दुष्काळ पाहिले, पण हा दुष्काळ मोठा आहे. त्या अनुषंगाने सरकारच्या उपाययोजना सुरू आहेत. दिवाळीत दुष्काळ जाहीर होईल," असे त्यांनी सांगितले.

थोडे दिवस थांबा गोड बातमी मिळेल...

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उरमोडीच्या पाण्याच्या केलेल्या मागणीबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात आवश्यक पाणी मागू शकतो, तर मकरंद पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत ते म्हणाले, अशा चर्चा होत राहतात, थोडे दिवस थांबा गोड बातमी मिळेल, असे सांगितले. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी अमित कदम, तर सरचिटणीसपदी निवास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुप्रिया ताईंवर आंदोलनाची वेळ येणार नाही...

खासदार सुप्रिया सुळे यांनी अंबवडे येथील सभेत किसन वीर साखर कारखान्याने 400 कोटी दिले नाहीत, तर मी आंदोलन करणार आहे. यावर आमदार मकरंद पाटील म्हणाले, "सरकारने थक हमीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे थक हमीचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात साखर आयुक्त यांच्याकडे सादर केला आहे. याची सुप्रियाताई यांना कल्पना आहे. या कारखान्याच्या डोक्यावर यापूर्वीच्या प्रशासनाने काही शेकड्याच्या कोटीत कर्ज करून ठेवले आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने त्या बोलल्या असाव्यात. 400 कोटी हे सरकारने मान्य केलं, तर याचा फायदा नेमका कोणाला होणार? यावर ते मकरंद पाटील म्हणाले, याचा फायदा हा कारखान्याला अन् सभासदांना होणार आहे. जो आज आर्थिक अडचणीत आहे. ती आर्थिक गर्तेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे सुप्रियाताई यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT