Shrinivas Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Lok Sabha Constituency: सनदी अधिकारी, राज्यपाल ते खासदार... श्रीनिवास पाटील यांचा थक्क करणारा प्रवास

Satara Political News : शरद पवारांशी असलेली मैत्री अन् त्यांच्या शब्दाखातर सनदी अधिकारीपदाचा राजीनामा देत श्रीनिवास पाटलांनी राजकारणात प्रवेश केला होता.

Umesh Bambare-Patil

Lok Sabha Election 2024 : सनदी अधिकारी, खासदार ते राज्यपाल आणि आता सातारा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अशी श्रीनिवास पाटील यांची वाटचाल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेली मैत्री आणि त्यांच्या शब्दाखातर त्यांनी सनदी अधिकारीपदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. कराड लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार झाले. त्यानंतर सिक्कीमचे राज्यपाल म्हणून त्यांना संधी मिळाली.

2019 च्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी त्यांना सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढण्यास सांगितले. त्यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या सभेत भर पावसात भिजत खासदार शरद पवार यांनी माझ्याकडून झालेली चूक सातारकरांनी दुरुस्त करावी, अशी विनंती केली.

सातारकरांनी शरद पवारांच्या शब्दाला मान देत श्रीनिवास पाटील यांना निवडून दिले. स्वच्छ, पारदर्शक चेहरा, प्रशासनाचा गाढा अभ्यास, या वयातही मतदारसंघात असलेला त्यांचा दांडगा संपर्क यामुळे श्रीनिवास पाटील हे सातारकरांच्या पसंतीस उतरले आहेत. 2024 च्या निवडणुकीसाठी खासदार शरद पवार यांनी त्यांनाच मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा-जावळी, वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण या सहा मतदारसंघांचा समावेश होतो. 1951 ते 1998 पर्यंत 1996 चा अपवाद वगळता या मतदारसंघावर काँग्रेसची मक्तेदारी होती. या कालखंडात यशवंतराव चव्हाण, किसन वीर, प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले हे दिग्गज नेते या मतदारसंघातून खासदार झाले. 1996 मध्ये शिवसेनेचे हिंदूराव नाईक-निंबाळकर खासदार झाले होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 1999 पासून आतापर्यंत या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 2004 पर्यंत दिवंगत लक्ष्मणराव पाटील साताराचे खासदार राहिले. त्यानंतर शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत घेऊन खासदार केले. 2009 ते 2019 पर्यंत उदयनराजे भोसले यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. 2019 च्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्यांनी दोनच महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला.

नाव (Name)

श्रीनिवास दादासाहेब पाटील

जन्मतारीख (Birth Date)

11 फेब्रुवारी 1941

शिक्षण (Education)

एमए, एलएलबी, डॉक्टरेट ऑफ सायन्स

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

पाटण तालुक्यातील मारुल हवेली या गावात एका शेतकरी कुटुंबात श्रीनिवास पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दादासाहेब पाटील हे निष्णात वकील होते. ते मारुलकर वकील या नावाने परिचित होते. आई अनूसया गृहिणी होत्या. पत्नी रंजनादेवी गृहिणी आहेत. त्यांच्या पुत्राचे नाव सारंग असून, रचनादेवी या स्नुषा आहेत.

सारंग पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) माहिती व तंत्रज्ञान विभागाचे (आयटी सेल) प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षाच्या बूथनिहाय संगणकीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. लहानपणापासूनच श्रीनिवास पाटील यांना कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, पी.डी. पाटील यांच्यासारख्या थोर नेत्यांचा सहवास लाभला.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

1965 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून श्रीनिवास पाटील यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवडी झाली. 1965 ते 1967 ते करवीरचे (ता. कोल्हापूर) प्रांताधिकारी, 1967 ते 1969 हिंगणघाट, वर्धाचे प्रांताधिकारी, 1969 ते 71 या कालावधीत संगमनेरचे (जि.नगर) प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले. 1971 ते 1973 संगमनेर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले. 1973 ते 1975 पर्यंत पुन्हा संगमनेरचे प्रांताधिकारी राहिले. 1975 ते 79 या कालावधीत ते हिंदुस्थान अँटिबायाोटिक्सचे सिनिअर पर्सनल मॅनेजर म्हणून काम पाहिले.

1977 ते 78 पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 1978 ते 85 औद्याोगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, 1979 मध्ये त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) पदोन्नती मिळाली. 1983 ते 85 या कालावधीत रायगडला उद्योग व ऊर्जा विभागाचे उपसचिव म्हणून जबाबदारी मिळाली.

1985 ते 87 या कालावधीत ते साखर संचालक झाले. 1987 ते 88 बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. 1988 ते 92 पुण्याचे जिल्हाधिकारी, 1992 ते 95 पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून जबाबदारी दिली गेली. 1995 मध्ये नागपूर विभागाचे उपायुक्त, 1995 ते 1996 नाशिकला आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त, 1996 ते 1999 नागपूर सुधार प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

सातारा

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

10 जून 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 30 जून 1999 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार श्रीनिवास पाटील यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ऑक्टोबर 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कराड मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार झाले. 2004 मध्ये ते दुसऱ्यांदा कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी मताधिक्क्य मिळाले.

2011 मध्ये ते प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष (नियोजन व विकास) झाले. 2013 मध्ये भाजपची सत्ता असतानाही ते सिक्कीमचे राज्यपाल झाले. त्यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकालात त्यांनी सिक्किममध्ये उल्लेखनीय काम केले. 2019 मध्ये सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि कराडचे खासदार म्हणून निवडून आले.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्याला ते सातत्याने प्राधान्य देतात. हेच त्यांच्यासाठी सामाजिक कार्य आहे. मतदारसंघात त्यांनी आतापर्यंत जवळपास 250 योजनांचा निधी मिळवून दिला आहे. पुणे-मिरज रेल्वेमार्गासाठी ब्रिटिशांच्या काळात संपादित जमिनींचा मोबदला त्यांनी मिळवून दिला आहे. वन्यप्राण्‍यासाठी उपचार मिळावेत, यासाठी वन्यजीव ट्रान्झिट सेंटर मंजूर करून घेतले आहे. खासदार पाटील यांच्या पुढाकारातून खावली येथे केंद्रीय विद्यालयाच्या उभारणीसाठी जागा मंजूर करण्यात आली आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला ? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले (भाजप) यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. यामध्ये श्रीनिवास पाटील विजयी झाले.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

शरद पवारांची जादू आणि श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांचा स्वकीयांसोबत विरोधी पक्षात असणारा व्यक्तिगत जनसंपर्क. शरद पवार यांनी त्यांच्यासाठी सातारा येथे भरपावसात भिजत घेतलेली सभा टर्निंग पाॅईंट ठरली.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

मुंजीपासून ते लग्नकार्यासह कठीण प्रसंगांतही ते लोकांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतात. तळागाळातील कार्यकर्त्यांशीही त्यांचे संबंध आहेत. पक्षातील कार्यकर्त्यांच्या संपर्काव्यतिरिक्त विरोधी पक्षातील कार्यकत्यांशीही त्यांचा वैयक्तिक संपर्क आहे. ईमेलव्दारे किंवा व्हॉट्सॲपवर जरी एखादे काम कार्यकर्त्याने पाठवले तरी ते करतात आणि त्याबाबत फोन करून कार्यकर्त्याला माहिती देतात.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टिटर व्हॉटसॲपच्या मध्‍यमातून ते सक्रिय असतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

2019 च्या निवडणुकीत त्यांनी, मान छत्रपतींच्या गादीला मत राष्‍ट्रवादीला, अशी घोषणा दिली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

ते प्रचंड उत्साही असून सतत लोकांच्या गराड्यात राहतात. स्पष्‍टवक्तेपणा आणि राजकारणविरहित समाजकारणामुळे ते लोकप्रिय आहेत. प्रशासनातील अनुभव आणि त्यामुळे विकासकामे मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

कामासाठी गेल्यावर अपुरी व खोटी माहिती दिलेली चालत नाही.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते....(If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

उमेदवारी न दिल्यास विधानसभा निवडणुकीत त्याचा राष्ट्रवादीला फटक बसू शकतो.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT