Lok Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात मोहिते-पाटील हे एक मातब्बर राजकारणी घराणे म्हणून ओळखले जाते. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्याकडून मिळालेली सहकाराची शिदोरी त्यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीच्या वाट्यालाही आलेली आहे. सहकार अधिक राजकारण बरोबर मोहिते-पाटील, असे गणित असलेले हे राजकीय घराणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
याचे कारण म्हणजे मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते यांनी यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शड्डू ठोकला आहे. या ठिकाणी आता रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, आता धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धारच केला आहे. त्यामुळे भाजपमध्येच राहून भाजपच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट करण्यासाठी आता संपूर्ण मोहिते-पाटील कुटुंब सरसावले आहे.
शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले धैर्यशील मोहिते-पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत. धैर्यशील मोहिते-पाटील यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणूनच नाही तर ते एक यशस्वी उद्योजकही आहेत. सहकार क्षेत्रातील विविध संस्था आणि उद्योगाच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. काका विजयसिंह यांच्याप्रमाणेच ते सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारे राजकारणी आहेत.
सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देत लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवामृत दूध संघ, साखर कारखाना या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे. त्यामुळे जमिनीवर राहून काम करणारा राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु तडकाफडकी निर्णय घेण्याच्या स्वभावामुळे राजकारणातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचीही चर्चा होत असते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, मोहिते-पाटील कुटुंबासाठी महत्त्वाकांक्षी असेलल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण या योजनेसाठी धैर्यशील मोहिते-पाटील हेही तितकेच आग्रही आहेत. या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रवादीतून पक्षांतर केल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक म्हणून पक्ष विस्तारात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
2019 मध्ये माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात धैर्यशील आणि मोहिते पाटील घराण्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते यांना पक्षाचे तिकीट मिळणार की ते बंडखोरी करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील
13 एप्रिल 1977
बी.कॉम
धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील हे माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मोहिते-पाटील या त्यांच्या आडनावातूनच त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट होते. मोहिते-पाटील हे नावच मुळात राज्याच्या राजकारणातील एक मातब्बर राजकारणी घराणे म्हणून ओळखले जाते.
या घराण्यात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्यासह तिसऱ्या पिढीतील रणजितसिंह, धैर्यशील आणि धवलसिंह मोहिते-पाटील यांनी राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात कायम मोहिते-पाटील घराण्याचा एकछत्री अंमल राखण्यात यश मिळवले आहे.
सहकाराचा वारसा लाभलेले धैर्यशील मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत. सत्यशील मोहिते हे धैर्यशील मोहिते यांचे थोरले बंधू असून ते उद्योगक्षेत्रात सक्रिय आहेत. 2016 मध्ये पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. धैर्यशील मोहिते हे एक मुरब्बी राजकारणी आहेत. मात्र, सहकारक्षेत्रात त्यांना साजेसा जम बसवता आला नाही.
धैर्यशील मोहिते-पाटील हे साखर कारखानदारी, शिवामृत दूध संघ, शिक्षण संस्था यासह विविध उद्योग सांभाळतात. धैर्यशील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते-पाटील याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. धैर्यशील यांना दोन मुली असून, त्या सध्या शिक्षण पूर्ण करत आहेत. धैर्यशील यांना भैय्यासाहेब या नावाने ओळखले जाते.
धैर्यशील मोहिते-पाटील हे सक्रिय राजकारणी तर आहेतच, याचबरोबर उद्योजक म्हणूनही ते यशस्वी झाले आहेत. शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे ते चेअरमन आहेत. शिवरत्न शिक्षण संस्थेचे चेअरमन, धैर्यशील स्टील आणि शुगर प्रा.लिमिटेड, शिवरत्न फॅब्रिक्स, राजइंदिरा टेक्स्टाईल आणि गारमेंट्स, ग्रीन फिंगर आयटी सोल्यूशन प्रा. लिमिटेड आदी उद्योग, व्यवसाय आहेत. सहकाराच्या माध्यमातून उद्योग वाढवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.
माढा
भाजप
धैर्यशील मोहिते-पाटील यांनी काका विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या यशस्वी सांभाळल्या आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अकलूज ग्रामपंचायत, सोलापूर जिल्हा परिषद, तसेच साखर कारखान्यांच्या निवडणुका लढवल्या आहेत. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पक्षनेतेपद भूषवले आहे. 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षश्रेष्ठींकडून राजकारण झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर पुढे संपूर्ण मोहिते कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी 2019 च्या माढा लोकसभा निवडणुकीत आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
त्यामुळे भाजपने धैर्यशील मोहिते-पाटील यांची माढा लोकसभा जिल्हा संघटक सरचिटणीसपदी निवड केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते-पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे सांगत आता धैर्यशील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मागील दोन वर्षांपासून तयारीही सुरू केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारीचे निर्णय होणार आहेत, आम्हाला उमेदवारी मिळणारच, असा दावाही धैर्यशील यांनी केला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष आगामी लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
धैर्यशील मोहिते-पाटील यांचा सामाजिक कार्यात मोठा हातभार आहे. त्यांनी विजय प्रताप युवा मंच, डॉटर मॉम्स फाऊंडेशन, शिवपार्वती ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. ताराराणी कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मुलींना कुस्ती क्षेत्रात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप करणे, अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. 2019 मध्ये सांगली कोल्हापूरमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागासाठी मदत पाठवण्याचे कामही त्यांनी केले होते. डॉटर्स मॉम्स फाऊंडेशनच्या वतीने मुलाच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे श्रेय देखील मोहिते-पाटील यांना जाते.
निवडणूक लढवली नव्हती
निवडणूक लढवली नव्हती
धैर्यशील हे जनसामान्यांत रुळलेले व्यक्तिमत्व आहे. डॉटर मॉम्स फाऊंडेशन, शिवामृत दूध संस्था, शिवरत्न शिक्षण संस्था यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क दांडगा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गावागावात त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. माढा लोकसभेची तयारी त्यांनी अचानक सुरू केलेली नाही.
यासाठी त्यांनी मागील तीन वर्षांपासून गावभेटी, समारंभांना उपस्थिती लावण्याचा नित्यक्रम सुरूच ठेवला होता. राष्ट्रवादी पक्षात असल्यापासून मोहिते-पाटील यांना मानणारा मतदारवर्ग मोठा आहे. धैर्यशील यांचा राजकारणासह सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोठा सहभाग असतो. त्यामुळे जनतेशी त्यांचा दैनंदिन संपर्क होतच राहतो. जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था, साखर कारखाना, पेट्रोल पंप, गारमेन्टस अशा विविध क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांचा जनतेशी होणाऱ्या संपर्कामध्ये खंड पडत नाही, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
धैर्यशील मोहिते-पाटील हे एक उच्चशिक्षित राजकारणी आणि उद्योजक आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचे महत्त्व ओळखून आहेत. ते सातत्याने आपल्या कामाची प्रसिद्धी सोशल मीडियावर करत असतात, गावभेटी, कार्यकर्त्यांची केलेली कामे, मतदारसंघातील प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती ते अपलोड करत असतात.
तसेच ते विविध क्षेत्रांत कार्यरत असल्याने आणि दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या देखील उल्लेखनीय आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपचे काम सुरु केल्यापासून मोदी सरकारच्या सर्व योजनांची माहिती ते आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून पोस्ट करताना दिसून येतात. माढा मतदारसंघातील मतदारांपर्यंत विविध सरकारी योजना पोहोचवण्यासाठी ते आग्रही असल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून येते.
धैर्यशील मोहिते-पाटील यांचा स्वभाव संयमी आहे, ते राजकीय भाष्य करत असताना फारसे आक्रमक होऊन बोलताना दिसून येत नाहीत. मात्र, 2021 मध्ये सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी 2021 मध्ये अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर सोपवली होती. मात्र, मोहिते पाटील यांच्या चुकीने ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांची एक जागा बिनविरोध निवडून आली. त्यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर राजकीय संन्यास घेणार असल्याची घोषणा धैर्यशील यांनी अकलूजमध्ये केली होती. मात्र, पुढे ते राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील
धैर्यशील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. या निवडणुकीसाठी त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून जोरदार तयारी केली आहे. त्यांच्यासाठी मोहिते-पाटील आडनावाचा ब्रँड ही सर्वात मोठी सकारात्मक बाजू आहे. कारण सोलापूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात आजही मोहिते-पाटील या घराण्याचा दबदबा कायम आहे. विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांची ताकद त्यांच्या पाठिशी आहे. मागील तीन दशकांपासून मोहिते-पाटील घराण्याला मानणारा मतदारवर्ग आजही मोठ्या संख्येने आहे.
2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दोन निवडणुकीत राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला भेदून भाजपचे उमेदवार विजयी करण्यात मोहिते-पाटील घराण्याची भूमिका महत्त्वाची ठरली. थोडक्यात माढा मतदारसंघात पक्ष नाही, तर मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व अधिक आहे. हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी सकारात्मक बाजू आहे. मोहिते-पाटील यांचे माढा मतदारसंघातील दु्ष्काळी भागात पाणी पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे जनतेला माहिती आहेत. त्यातील नीरा-देवधर योजनेला मंजुरी मिळाली आहे. कृष्णा -भीमा स्थिरीकरण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास या भागाचे चित्रच पालटणार आहे. मोहिते-पाटील यासाठी आग्रही आहेत.
धैर्यशील हे मोहिते-पाटील घराण्यातील तिसऱ्या पिढीतील तरुण राजकारणी आहेत. मोहिते-पाटील घराण्याचा प्रत्येक निवडणुकीत वरचष्मा राहिला आहे. विशेषत: कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मोहिते-पाटील कुटुंबाचा सदस्य महत्त्वाच्या पदाचा दावेदार असतोच, जर त्या ठिकाणी राजकीय आरक्षण असेल तरच इतर व्यक्तीला संधी मिळते. मात्र, इतरवेळी महत्त्वाची पदे मोहिते-पाटील यांच्या घरातच वाटप झालेली दिसून येतात.
कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमीच असते. परिणामी, केवळ कौटुंबिक विकासाच्या राजकारणामुळे जनतेमधून मोहितेंच्या विरोधात नाराजीचा सूर दिसून येतो. पक्षीय राजकारणाला महत्त्व देण्याऐवजी गटाच्या राजकारणाला महत्त्व देण्याचा मोहिते-पाटील यांचा जोर असल्याने पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये एकसंधता दिसून येत नाही. या व्यतिरिक्त मोहिते-पाटील ज्या कृष्णा भीमा-स्थिरीकरण योजनेचे राजकीय भांडवल करत आहेत, ती योजना खर्चिक असल्याचे मागे अजित पवारांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे ही योजना पूर्णत्वास जाईल की नाही, याबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे.
त्यामुळे मोहिते-पाटील यांचा कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा राजकारणासाठी तितका प्रभावी ठरताना दिसून येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता करमाळा, फलटण, माढा, माण, खटाव या विधानसभा मतदारसंघांत रणजितसिंह निंबाळकर यांचे पारडे जड दिसून येत आहे. आमदार शिंदे बंधू, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी निंबाळकरांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बेरजेच्या राजकारणात मोहिते पाटील कमी पडताना दिसून येत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही. भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी गेल्या चार वर्षांत मतदारसंघात विकासकामे करण्यावर भर दिला आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी निंबाळकरांना पुन्हा संधी देण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे विद्यमान खासदाराचे चांगले काम असताना भाजपकडून त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे.
तरीही धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडून उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा दावा केला जात आहे. तसेच त्यांच्या समर्थकांकडूनही धैर्यशील मोहिते-पाटील हेच खासदार म्हणून सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपकडून निंबाळकरांना पुन्हा संधी देत धैर्यशील मोहिते-पाटील यांना तिकीट नाकारल्यास या मतदारसंघात मुख्य लढत ही मोहिते-पाटील विरुद्ध निंबाळकर अशी पाहायला मिळू शकते. त्यामुळे या ठिकाणी भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
माढा मतदारसंघात मोहिते-पाटील यांच्या आजपर्यंतच्या कामाच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर धैर्यशील मोहिते हे बंडखोरी देखील करू शकतात,अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी ज्याप्रमाणे रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी 2019 च्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अधिकृत प्रवेश केल्याचे जाहीर केले नव्हते. इतकेच नाही तर मी अजून राष्ट्रवादी सोडली नसून रणजितदादांनी भाजप प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्याप्रमाणेच केवळ धैर्यशील मोहिते-पाटील हे भाजपमधून बाहेर पडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अर्थात इतर मोहिते-पाटलांची त्यांना मूक संमती असणारच हेही तितकेच खरे आहे.
2019 मध्ये माढा मतदारसंघात मोहिते-पाटील गटाचे विरोधक राष्ट्रवादीच्या माध्यमातून सक्रिय असताना देखील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभेत लाखाचे मताधिक्क देत निंबाळकरांना खासदार केले होते. तर विधानसभा निवडणुकीत माळशिरसमधून राम सातपुते यांच्यासारख्या आयात उमेदवाराला आमदार बनवण्याची किमया मोहिते-पाटलांमुळेच शक्य झाली होती. त्यामुळे यावेळी भाजपला मोहिते-पाटलांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, हे मोहिते-पाटलांना देखील माहिती आहे. त्यामुळेच भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा दावा धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडून केला जात आहे.
अशाही परिस्थितीत निंबाळकरांची उमेदवारी फिक्स झाल्यास धैर्यशील मोहिते हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. मात्र, त्यांना पक्षातूनच रसद पुरवली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कारण भाजपला मोहिते पाटलांची नाराजी न पत्करता माढा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच ठेवायचा आहे. मग तिथे खासदार कोण याचा जास्त विचारही पक्षाकडून केला जाणार नसल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर गेल्यावेळी निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या संजयमामा शिंदे यांनी यावेळी निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार निश्चिती झालेली नाही. त्यातच शरद पवारांनी मध्यतरी अकलूजला दिलेल्या भेटीचा अर्थ धैर्यशील मोहितेंच्या उमेदवारीतूनही स्पष्ट होऊ शकतो.
धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवण्याचाही एक पर्याय उपलब्ध असल्याची चर्चाही होत आहे. मात्र काहीही झाले तरी भाजप हा मतदारसंघ हातचा जाऊ देणार नाही, त्यासाठी ते मोहिते-पाटील आणि निंबाळकर यांच्या वादावर कशापद्धतीने तोडगा काढते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(Edited By - Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.