Jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Election 2026 : राष्ट्रवादीकडून भाजपच्या जयकुमार गोरेंचं विमान जमिनीवर : सुसाट सुटलेल्या ग्रामविकास मंत्र्यांना पद्धतशीरपणे रोखले

Satara ZP Panchayat Samiti election 2026 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लागली अन् भाजपने आपले दमदार शिलेदार प्रत्येक गट व गणातून मैदानात उतरवले. मागच्या चुकांपासून धडा घेत राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी आपली गोळाबेरीज केली. एकमेकांना मान- सन्मान देत उमेदवार निवडून त्यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले.

रूपेश कदम

Satara News, 12 Feb : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत 15 विरुद्ध शून्य असा निकाल घेण्याच्या उद्देशाने हवेत उडालेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे अर्थात भाजपचे विमान राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी जमिनीवर उतरवले. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी आपले अस्तित्व राखले, तर आंधळी व बिदालने भाजपची नामुष्की टाळली.

मोठ्या कालावधीनंतर राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते मनापासून व मोठ्या जल्लोषात गुलालात रंगले, तर कुकुडवाड व इतर गटातील पराभवाने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले. चौथ्यांदा आमदार, त्यातही ग्रामविकास मंत्री झाल्यापासून जयकुमार गोरे यांचा वारू सुसाट सुटला होता. हा वारू माण- खटावसह संपूर्ण सातारा जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यात चौफेर उधळला होता.

म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत या उधळलेल्या वारूने राष्ट्रवादी व मित्रपक्षांना चिरडून टाकले होते. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी व मित्रपक्षांची अवस्था काय होणार? यासह भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करणार याचीच चर्चा सर्वत्र रंगली होती.

गोळाबेरीज करत मान- सन्‍मानाची नांदी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लागली अन् भाजपने आपले दमदार शिलेदार प्रत्येक गट व गणातून मैदानात उतरवले. मागच्या चुकांपासून धडा घेत राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी आपली गोळाबेरीज केली. एकमेकांना मान- सन्मान देत उमेदवार निवडून त्यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या पहिल्याच घासाला खडा लागला. आंधळी गणातील राष्‍ट्रीय समाज पक्षाच्या सुनील जाधव यांनी मैदानातून पळ काढला.

अर्जुन काळे बिनविरोध निवडून आल्याने भाजपच्या उत्साहाला उधाण आले. भरीस भर म्हणून आंधळी गटातून राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार योगिता दडस यांनी सुद्धा माघार घेतल्याने अडचणीत वाढ झाली. आता १५ - शून्य लांब नाही, असा आत्मविश्वास घेऊन भाजप सज्ज झाला. याचवेळी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा बिकट परिस्थितीत राष्ट्रवादी व मित्रपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार झाले.

आक्रमकतेला शांततेचे प्रत्‍युत्तर

निवडणूक प्रचारा दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रान उठवून दिले. जिहे-कठापूर, टेंभूचे पाणी सोडले. आश्वासनांची खैरात वाटली. सोबतच ग्रामविकास मंत्री मी असल्याने विकास करण्यासाठी, निधी आणण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा सुद्धा दिला. जयकुमार गोरे व टीमच्या प्रचाराचा आक्रमक पवित्रा पाहता या वादळात राष्ट्रवादी व मित्रपक्षांचा निभाव लागण्याची शक्यता कोणालाही वाटत नव्हती. मात्र, प्रभाकर देशमुख व महादेव जानकर यांनी सूक्ष्म नियोजन करत शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली.

एकजुटीमुळे शांतीत क्रांती

कुकुडवाड गटात अनिल देसाई व‌ अभयसिंह जगताप यांनी एकत्र येत सकारात्मक पाऊल उचलले. त्यातच त्यांना प्रभाकर देशमुख व महादेव जानकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. गणातील उमेदवार विक्रम शिंगाडे व विद्या काटकर यांची साथ मोलाची ठरली. संपूर्ण देसाई कुटुंबाने एकत्रित येत शांतीत क्रांती केली. त्याचवेळी भाजपचा आक्रमक प्रचार कुकुडवाडकरांच्या पचनी पडला नाही. जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या पाच सभा व अरुण गोरे यांचा झंझावाती प्रचार त्यांना विजयापर्यंत पोहोचवू शकला नाही. आपला माणूस, कामाचा माणूस ही अनिल देसाई यांची टॅगलाइन त्यांना विजयी करून गेली.

मतदारांना आपलेसे करण्‍यात अपयश

वारसा विचारांचा की विकासाचा यामध्‍ये मार्डीतील जनतेने विचारांचा वारसा निवडला. दोन सख्ख्या जावांच्या लढतीत दोन सख्ख्या भावांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या घरातील या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यातच भाजपने गणात तगडे उमेदवार देऊन आव्हान निर्माण केले होते. मात्र, गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मतदारांशी असलेली नाळ इथं सरस ठरली.

राष्ट्रवादीच्या मनोज पोळ यांनी सोनाली पोळ यांची प्रचार यंत्रणा अतिशय शांतपणे हाताळली. त्यांना प्रभाकर देशमुख यांच्यासह श्रीराम पाटील, बबन वीरकर, सुभाष नरळे, सूर्याजीराव जगदाळे यांनी चांगली साथ दिली. डॉ. भारती पोळ यांचा प्रचार करताना डॉ. संदीप पोळ यांना भाजपने केलेला विकास मतदारांच्या गळी उतरवता आला नाही‌. गणांची अदलाबदल झालेले भाजपचे उमेदवार मतदारांना आपलेसे करू शकले नाहीत.

गोंदवले गटात पुन्‍हा राष्‍ट्रवादीचे प्राबल्‍य

प्रभाकर देशमुख यांनी पत्नी अनुराधा देशमुख व कन्या हर्षदा देशमुख- जाधव यांना सोबत घेत स्वतःच्या गोंदवले बुद्रुक गटाची धुरा सक्षमपणे सांभाळली. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने काहीसा दुर्लक्षित झालेला हा गट राष्ट्रवादीच्या अचूक नियोजनामुळे भाजपला धक्का देऊन गेला. इथे राष्ट्रवादीने उमेदवारी निवडीत बाजी मारली होती, तर भाजपची उमेदवारी निवड चुकल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

गोंदवले बुद्रुक गट व गण जिंकत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र, पळशी गणात भाजपच्या डॉ. राजेंद्र खाडे यांनी अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या नवख्या मानसिंग खाडे यांना पराभूत केले. गोंदवले बुद्रुक गावांसह लोधवडे, किरकसाल या गावांनी राष्ट्रवादीला चांगलीच साथ दिली, तर पळशी या गावाने भाजपला तारले.

बिदाल, आंधळीत भाजपची ‘दादागिरी’

बिदाल व आंधळी हे गट भाजपचे बालेकिल्ले. या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपने मोठ्या फरकाने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला. आंधळी गटात शेखर गोरे यांनी जबरदस्त कामगिरी करत जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याची किमया केली, तर बिदाल गटात सुद्धा दहा हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून भाजपने आपली ताकद दाखवून दिली. तीन गट जिंकलेल्या राष्ट्रवादीला या दोन्ही गटातील अतिशय कमकुवत कामगिरी विचार करायला भाग पाडणारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT