

- पांडुरंग बर्गे
Shashikant Shinde won Koregaon seat after 4 consecutive losses: विधानसभेचे सलग 2, लोकसभेचा १ आणि जिल्हा बँकेचा १ अशा ४ निवडणुकांतील पराभवानंतरही तसूभर खचून न जाता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपली जिद्द, चिकाटी कायम राखत यशाची फळे अखेर चाखलीच, तर आमदार महेश शिंदे यांच्या सत्तेत मशगूल असणाऱ्या समर्थक, कार्यकर्त्यांनी गृहीत धरलेल्या गणितांचा परिपाक त्यांना वजाबाकीकडे घेऊन गेला.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेशी ठेवलेला दैनंदिन जनसंपर्क व ऐन निवडणुकीवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मिळालेल्या मोलाच्या खंबीर साथीचे प्रतीक म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये मिळालेले हे धवल यश असल्याची चर्चा आहे.
कोरेगाव पंचायत समितीवर सुरुवातीला शंकरराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, नंतर शंकरराव जगताप व डॉ. शालिनीताई पाटील युतीची सत्ता राहिली. २०१७ मध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसची एकतर्फी सत्ता आली. ५ वर्षे शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने लोकाभिमुख अशी विकासकामे केली.
मात्र, त्यानंतर २०१९ च्या कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत तिसऱ्या ‘टर्म’साठी रिंगणात उतरलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांचा मूळ भाजपच्या मात्र ऐनवेळी शिवसेनेची उमेदवारी घेतलेल्या महेश शिंदे यांनी निसटत्या मतांनी पराभव करत आपल्या राजकारण, समाजकारणाचा एक नवा अध्याय सुरू केला.
प्रारंभी आघाडी सरकारच्या काळात फारसे काम करता आले नसले तरी त्यानंतर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महायुती सरकारच्या काळात महेश शिंदे यांना कामे करण्याची मोठी संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी मतदारसंघामध्ये विविध विकासकामे करण्याचा सपाटा लावला.
त्याच्या उलट निसटता पराभव झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांना मिळालेल्या विधान परिषद सदस्य तथा आमदारकीचा फायदा विरोधी बाकावर असल्यामुळे विविध विकासकामे मतदारसंघामध्ये खेचून आणण्यासाठी करता आला नाही. मात्र, स्वतः त्यांनी व त्याच्या कार्यकर्त्यांनी चिकाटी सोडली नाही.
आपली जनतेशी असलेली बांधिलकी कायम ठेवत जनसंपर्कावर लक्ष केंद्रित केले. प्राप्त आमदारकीच्या माध्यमातून सरकार दरबारी प्रलंबित विकासकामांसाठी निधी मिळवणे, नव्याने छोटी मोठी विकास कामे आणणे, जनतेच्या व्यक्तिगत छोट्या- मोठ्या अडीअडचणी सोडवणे, सुख दुःखात सहभागी होणे असा जनसंपर्क कायम ठेवला.
त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांना आधी उदयनराजे भोसले व नंतर महेश शिंदे यांच्याकडून दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, खचून न जाता शशिकांत शिंदे यांनी स्वतः आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये जनसंपर्क ठेवत आपले संघटन मजबूत ठेवल्यामुळेच त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीत मोठा विजय मिळाला. कोरेगाव पंचायत समितीवर एकहाती सत्ता कायम ठेवणे शक्य झाले.
कोरेगावमधील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या विजयात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली युती अथवा एकत्रित ‘घड्याळ’ चिन्हावर लढण्याचा निर्णयही मैलाचा दगड ठरला. कारण तत्पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, तर सर्व जागांवर उमेदवार मिळण्याची साशंकता याच गटातील काही जबाबदार कार्यकर्ते खासगीत व्यक्त करत असत.
मात्र, निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यामुळे मजबूत असे उमेदवार मिळाले. तरीही एकंबे गटामध्ये ऐनवेळी तगडा उमेदवार आयात करावा लागला. असे असले तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे गावोगावी कार्यकर्त्यांचे झालेले मजबूत संघटन, कऱ्हाड उत्तरचे माजी आमदार बाळासाहेब पाटील, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मोठ्या मदतीमुळे मोठा विजय साकार झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दुसऱ्या बाजूने शिवसेनेचे दुसऱ्या टर्मचे आमदार महेश शिंदे यांनी राज्य सरकारातील सत्ता तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये विविध विकासकामे खेचून आणली आहेत.
व्यक्तिगत कामांचाही त्यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे, तसेच कृष्णा खोरे महामंडळातील उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून मतदारसंघातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दोन टीएमसी जादा पाण्याची मंजुरी मिळवून या पाण्याच्या वितरणाचे काम सुरू केले आहे.
अशा स्थितीतही महेश शिंदे यांच्या बहुतांश उमेदवारांना या निवडणुकीमध्ये जनतेने नेमके का नाकारले? याचे कुठे तरी सर्वच पातळ्यांवरून तातडीने आत्मपरीक्षण करून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.
कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित ‘घड्याळ’ चिन्हावर लढत असताना निवडणुकीच्या मध्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मात्र, या निधनामुळे तालुक्यातील निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन बदलले.
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतरांच्या प्रचार सभा रद्द झाल्या. भाजपचा प्रचारही थंडावला, तर अजित पवार यांच्या निधनाची सहानुभूती त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना काहीअंशी तरी मिळाली असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.