Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने धक्कादायकरित्या विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे 5 सदस्य फोडत भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे विजयी झाल्या. तर भाजपचेच राजू भोसले उपाध्यक्ष झाले. आता फुटलेले ते 5 सदस्य नेमके कोण? ही माहिती समोर आली आहे. त्या पाचही जणांची नावं उघडं झाली आहेत.
65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत भाजपच्या 27 जागा निवडून आल्या आहेत. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने निवडणूक पूर्व आघाडी केली होती. या आघाडीतील राष्ट्रवादीला 20 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. स्वाभिमानीच्या एका सदस्यानेही राष्ट्रवादीसोबतच गटनोंदणी केली आहे. शिवाय काँग्रेसचाही 1 सदस्य याच आघाडीसोबत होता. असे मिळून या आघाडीकडे 37 चे संख्याबळ होते.
बहुमतापेक्षा हा चार मते जास्त असूनही भाजपचा उमेदवार विजयी झाला. आजच्या निवडणुकीत भाजपला 33 आणि राष्ट्रवादी-शिवसेनेच्या उमेदवाराला 30 मते मिळाली. ही 33 मते मिळविण्यासाठी भाजपने मागच्या मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करायला सुरुवात केली होती. भाजपने आधी अपक्ष सदस्या विद्या वेताळ यांना आपल्या बाजूने वळवले.
भाजपला अजूनही बहुमतासाठी 5 सदस्यांची गरज होती. मग भाजपने बुध गटातील राष्ट्रवादीच्या सदस्या लता कर्णे यांना उघडपणे सोबत घेतले. त्यानंतर आजच्या निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्यामुळे कुमठे गटातील हणमंतराव जगदाळे आणि सातारा रोड गटातील सारीका जगदाळे या महेश शिंदे समर्थक सदस्यांनी भाजपला मतदान केले.
याशिवाय फलटण तालुक्यातील गुणवरे गटातील राष्ट्रवादीच्या सदस्या ऋतुजा जगताप यांनीही भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना मतदान केले. खेड गटातील राष्ट्रवादीचेच सदस्य कामेश कांबळे यांच्याकडून जबरदस्ती भाजपला मतदान करायला लावल्याचे सांगितले जाते. प्रचंड गोंधळात हे मतदान पार पडले. यात कामेश कांबळे यांना जबरदस्ती हात वर करायला लावल्याचा आरोप आहे.
राष्ट्रवादीचे 2 सदस्य मतदानापासून वंचित :
भाजपने राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांवर शिवसेना सदस्य बापू शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप करत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यात पोलीस अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अटक करणार अशी चाहुल मंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंदआबा पाटील यांना लागली. खबरदारीचा उपाय म्हणून स्वतः मंत्र्यांनी या सदस्यांना आपल्या गाडीतून थेट जिल्हा परिषदेत आणले.
शंभुराज देसाई या सर्वांना सभागृहाकडे घेऊन जात होते. त्याचवेळी जिन्यात पोलिसांनी अटक करण्यासाठी या दोघांनाही अडवलं. यावेळी पोलीस आणि शंभुराज देसाई या दोघांमध्येही बरीच झटापट झाली. याच झटापटीत शंभुराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली, त्यांचा रक्तदाबही वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. पण पोलिसांनी सभागृहात जातानाच दोघांनाही अटक केल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.