Satara, 28 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांचा एकेरी उल्लेख करत ‘तो एसपी घरगड्यासारखा वागलाय, त्याला तत्काळ निलंबित करा,’ अशी मागणी केली होती. तेच शंभूराज देसाई आणि एसपी दोशी हे राड्यानंतर आज आठ दिवसांनंतर प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. विशेष म्हणजे पत्रकारांच्या प्रश्नावर ‘त्यांची का अडचण करताय,’ म्हणत दोशींची बाजू सावरण्याचा प्रयत्नही केला.
सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara ZP) अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाच सदस्यांना फोडून आपल्या बाजूने वळवत बहुमत मिळविले होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदान करू न देता अटक केली होती.
पोलिस त्या दोघांना घेऊन जात असताना पालकमंत्री देसाई यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) यांना धक्कबुक्की केली होती, त्याचे पडसाद विधीमंडळात उमटले होते. त्या वेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी ‘तो एसपी घरगड्यासारखा वागलाय, त्याला तत्काळ निलंबित करा, सेवेतून त्याला बडतर्फ करा. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असा इशारा दिला होता.
मंत्र्यांवर अरेरावी करणारा, मंत्र्याला जखमी करणाऱ्या पोलिस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, सब इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्यासोबतचे शंभर पोलिस यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली होती. त्यामुळे पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनात दरी निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
सातारा झेडपीतील राड्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे आठ दिवसांनंतर एकाच व्यासपीठावर आले होते. सातारा जिल्ह्यातील इंधनाच्या साठ्याचा आढावा घेतला. त्या बैठकीला जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी दोशी यांच्याबाबत प्रश्न विचारताच त्यांची का अडचण करताय, असा उलट सवाल शंभूराज देसाई यांनी केला.
तुम्हाला आडवायला शंभर पोलिस लागतात, आबांना काय दोन चालतात, असा प्रश्न पत्रकारांनी करताच ‘लगा माझं वजन कितीय,’ अशी कोटी शंभूराज देसाईंनी केली. त्यानंतर एसपी तुषार दोशी यांच्याबाबत प्रश्न विचारताच ‘त्यांची का अडचण करताय, बिचारे पालकमंत्री आलाय म्हणून ते प्रोटोकॉलनुसार बसले आहेत. त्यांची का अडचण करता, मला खासगीत विचारा की सर्व सांगतो,’ असे विधान शंभूराज देसाई यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.