Satara ZP Controversy Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Controversy : साताऱ्यात राजकारण तापलं : भाजप ZP अध्यक्ष-उपाध्यक्षांनी दर्शन घेतलेले प्रीतिसंगम गोमूत्र शिंपून पवित्र करणार

Zilla Parishad President Election : सातारा झेडपी वादावर कऱ्हाडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन झाले. फेरनिवडणुकीची मागणी करत स्मृतिस्थळ शुद्धीकरणाच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 24 March : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान उद्‌भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड शहरात सर्वपक्षीय आक्रमक झाले आहेत. झेडपीतील अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदचे नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांनी प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले. त्यामुळे ते स्मृतिस्थळ पवित्र करण्यासाठी उद्या (बुधवारी) सकाळी गोमूत्र शिंपडण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रीय काँग्रेस, तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकत्र येत निषेध आंदोलन करत सातारा (satara) प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

सातारा जिल्हा परिषद (satara Zilla parishad) अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह १०० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे निर्देश दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. या निर्देशानंतर राजकीय वातावरण अधिक तापले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे.

येथील दत्त चौकात आज दुपारी नगरसेवक विजयसिंह यादव, राजेंद्र माने, अखिल भरतील मराठा संघाचे अनिल घराळ, सचिन पाटील, मोहन कदम, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, रुपेश मुळे, वैशाली जाधव, विनायक भोसले, विवेक कुराडे पाटील, रोहन विभुते आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विविध पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी यावेळी निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उमेदवारांना मतदानाचा अधिकार असताना प्रशासनाने हस्तक्षेप करून तो हिरावून घेतला. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने पार पडली असून, ही निवड आम्हाला मान्य नाही, असा आरोप करत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक नव्याने घेण्याची मागणी करण्यात आली.

स्मृतिस्थळ पवित्र करणार

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर येथील प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नूतन पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केल्याचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला. या कृतीवर नाराजी व्यक्त करत स्मृतिस्थळ पवित्र करण्यासाठी उद्या (बुधवारी) सकाळी गोमूत्र शिंपडून पुन्हा पवित्र करण्यात येईल, असे नगरसेवक विजयसिंह यादव यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT