

Satara, 23 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी हातात बहुमत असूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सत्ता स्थापन करता आली नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत विषय तापवला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने आता सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष फेरनिवडीसाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबाबतची माहिती खुद्द खासदार नितीन पाटील यांनी साताऱ्यात ही माहिती दिली आहे.
सातारा (Satara) जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडीवेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे ही निवडणूकप्रक्रिया संपूर्ण राज्यात चर्चिला जात आहे. विशेषतः पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर सर्वच बाजूंनी टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याबाबतच्या मुद्यावर दोन्ही पक्षांकडून भर दिला जात आहे.
खासदार नितीन पाटील (Nitin Patil) म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना सहभाग घेता येऊ नये, यासाठी त्यांच्यावर दोन वेळा अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार संशयास्पद आहे. पोलिस प्रशासनाचा वापर करून जिल्हा परिषद सदस्य फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणाच्या मास्टर माइंडचा शोध घेऊन न्यायालयीन चौकशीद्वारे त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. संपूर्ण निवड प्रक्रियेची वैध बाजू तपासण्यासाठी आणि फेरनिवडीसाठी कोर्टात न्याय मागण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांच्या अपहरणाची तक्रार निवडीच्या आदल्या रात्री दाखल झाली होती. त्यांनी त्याच दिवशी पहाटे महाबळेश्वर पोलिस ठाण्यात जाऊन लेखी दिले होते. दरम्यान आज पुन्हा ते लेखी जबाब देण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात खासदार पाटील यांच्या समवेत आले होते.
लेखी जबाबात बापू शिंदे यांनी म्हटले आहे की, माझे कोणीही अपहरण केलेले नाही. खोट्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे संपूर्ण कटकारस्थान आहे. तक्रार करणारा मुलगा माझ्याजवळ राहतही नाही.
अपहरणाच्या प्रकरणातील तक्रारदार हा बापू शिंदे यांचा मुलगा आहे. त्यालाही पाेलिसांनी २४ तास ताब्यात ठेवले होते. पोलिसांची ही भूमिका चुकीची आणि संशयास्पद होती. राज्यात विशिष्ट राजकीय पक्षाची सत्ता येऊ नये, यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले आहे, असा आरोप करून पाटील यांनी निवड प्रक्रियेची वैध बाजू तपासून फेरनिवडणुकीसाठी कोर्टात न्याय मागण्यात येणार आहे, असे सांगितले.
तक्रारदार मुलगा माझ्याजवळ राहत नाही : बापू शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांनी आज स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात इन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आला. त्यात त्यांनी ‘माझे अपहरण झालेले नाही,’ असे मी लेखी दिले असतानाही माझ्यावर कारवाई करण्यात आली. खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मुलगा माझ्याजवळ राहतही नाही आणि आमच्यात कोणताही संबंध नाही, त्याने दबावाखाली तक्रार दिली असावी, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.