Satara, 28 March : सातारा जिल्हा परिषदेची अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून झालेली धक्काबुक्की, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना मतदान करू न देता झालेली अटक यामुळे राज्यात गाजली. त्या वेळी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात त्यांच्याच उपस्थितीत देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही काही सूचना केल्या, त्यामुळे विषय समित्यांच्या सभापती निवडीत भाजपला रोखण्याची स्ट्रॅटेजी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) आवारातून पोलिसांनी आमचे अपहरण केले आहे, त्यामुळे आमचं अपहरण करणाऱ्या पोलिसांवर जिल्हाधिकाऱ्यांनीच गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी केली आहे. अपहरण प्रकरणी पोलिसांनी सात एप्रिलपर्यंत अहवाल द्यावा, असा आदेश महाबळेश्वर न्यायालयाने तपासी अंमलदरांना दिले आहेत.
पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाचा आढावा घेतला, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषद संपण्याच्या वेळीच राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे त्या ठिकाणी आले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांना आतल्या खोलीत बसण्यास सांगितले.
पत्रकार परिषद संपल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्याशी चर्चा केली. त्या तिघांची चर्चा सुरू असताना स्वत: जिल्हाधिकारी संतोष पाटील, तसेच पोलिस अधीक्षक तुषार दोशीही उपस्थित होते. काही वेळ चर्चा झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आतल्या खोलीत बोलावले. त्यानंतर सर्व जण बाहेर आले. त्यानंतर पालकमंत्री हे एमएसआरडीच्या बैठकीसाठी गेले, तर देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रती आवक जावक विभागात देऊन त्यावर पोच व शिक्का घेतला.
आज ठरणार सभापतिपदाच्या निवडणुकीची रणनीती
सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभापतिपदाच्या निवडी ह्या चार एप्रिल रोजी होणार आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे आज साताऱ्यात येणार आहेत. त्यामुळे आज आम्ही एकत्रित बसून चर्चा करू, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. फुटीर सदस्यांबाबत पालकमंत्री देसाई यांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले. फुटीर सदस्यांना अपात्र करावे, असा प्रस्ताव आम्ही आयुक्तांकडे पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी आम्ही जिल्हा परिषदेत गेलो होतो. मात्र, सभा उधळण्याचा आरोप करून पोलिसांनीच आमचे अपहरण केले. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेच्या शंभर मीटर आतमध्ये होतो, त्यामुळे आमचे अपहरण करणाऱ्या पोलिसांवर जिल्हाधिकाऱ्यांनीच गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी देसाई आणि मांडवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आम्ही या प्रकरणी हायकोर्टात जाणार आहोत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्या अपहरण प्रकरणी सात एप्रिलपर्यंत तपासी अंमलदारांनी आपले म्हणणे मांडावे असा आदेश महाबळेश्वर न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.