Kolhapur Farmers Protest Over Gokul; Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : 'फक्त मुलगा पडल्याचं दुःख..., मातंग, मराठा समाजाचा मुलगा पडला तेव्हा...? सतेज पाटलांचा मुश्रीफांना थेट सवाल

Satej Patil Targets Hasan Mushrif Chandrakant Patil Over Gokul : कोल्हापूरात गोकुळच्या प्रकरणावरून सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चा काढत सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : गोकुळ दूध संघातील शासननियुक्त चार तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीवरून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “गोकुळच्या माध्यमातून सहकार संपवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. हा निर्णय केवळ गोकुळपुरता मर्यादित राहणार नसून भविष्यात ग्रामपंचायत, गृहनिर्माण संस्था आणि इतर सहकारी संस्थांमध्येही अशाच पद्धतीने हस्तक्षेप होऊ शकतो,” असा आरोप त्यांनी केला. कोल्हापुरातील संघर्ष मोर्चात बोलताना त्यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आणि २०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापुरातील संघर्ष मोर्चा आता केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो महाराष्ट्राचा संघर्ष बनला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत सहकाराची परंपरा रुजली; मात्र आज याच भूमीत सहकाराचा कायदा पायदळी तुडवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना कोणाबद्दल ममत्व किंवा सूडबुद्धीने वागणार नाही, अशी शपथ घेतली जाते. मात्र गोकुळमधील घडामोडींवरून सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होतात, असेही ते म्हणाले.

‘गोकुळसाठीच कायदा केला, मग नंतर रद्द का केला?’

गोकुळमध्ये प्रशासक नेमण्याच्या मुद्द्यावरूनही पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या सुमारे सहा महिने आधीपासूनच प्रशासक नेमण्याचा प्रयत्न सुरू होता. प्रशासक येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत हा कायदा गोकुळसाठी केलेला नाही, असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात गोकुळवर प्रशासक आणण्यात आला.

विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर जुन्या संचालक मंडळाला निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्याची तरतूद पुन्हा करण्यात आली. मग गोकुळच्या बाबतीत वेगळी भूमिका का घेतली?” गोकुळमधील निवडणुकीसाठी अनेक सहकारी संस्थांना न्यायालयात जावे लागल्याचे सांगत पाटील यांनी प्रशासक नियुक्तीच्या निर्णयालाही विरोध केला. या संपूर्ण प्रक्रियेत सत्तेत सहभागी असलेल्या काही नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

‘माझे पॅनेल निवडून आणणे माझे कर्तव्य होते’

गोकुळच्या निवडणुकीत आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देताना पाटील यांनी आपल्या प्रचाराचा अनुभव सांगितला. “मी माझे पॅनेल निवडून आणण्यासाठी लोकांना भेटलो, त्यात माझे काय चुकले? प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रचार केला. सुमारे २४ दिवसांचा दौरा केला. प्रकृती ठीक नसतानाही कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. मी साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढत होतो.

माझे कुटुंबीय निवडणुकीत उभे नव्हते, तर सामान्य कार्यकर्ते उमेदवार होते,” असे ते म्हणाले. आपल्यासोबत राजू शेट्टी, गणपतराव पाटील, सत्यजित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते आणि कार्यकर्ते ठामपणे उभे राहिल्याचेही त्यांनी सांगितले. एका बाजूला तीन मंत्री, दोन खासदार आणि अनेक आमदारांची फौज होती, तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानासाठी लढणारे कार्यकर्ते होते, असे पाटील म्हणाले.

मुश्रीफ आणि चंद्रकांतदादांवर गंभीर आरोप

गोकुळमध्ये चार शासननियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयावरून पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर निशाणा साधला. “चार संचालक नेमण्याचा निर्णय या दोघांमुळेच झाला. हा लोकशाही आणि सहकार संपवण्याचा डाव आहे,” असा आरोप त्यांनी केला. निवडणुकीदरम्यान दुसऱ्या बाजूच्या काही उमेदवारांनी आपल्या पॅनेलशी प्रामाणिकपणे वागले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या पॅनेलमधील सर्व २५ उमेदवारांना मतदान करण्याची भूमिका आपण घेतली होती, असे त्यांनी सांगितले.

जातीयवादाचा आरोपांना प्रत्युत्तर

तसेच आपल्यावर जातीयवादाचे आरोप करणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “ मुश्रीफांनी माझ्यावर जातीयवादाचा आरोप केला जातो. त्यांचा मुलगा पडला असे चार वेळा उल्लेख केला. मात्र निवडणुकीत मातंग समाजातील मिंचेकर आणि मराठा समाजातील युवराज बापू यांचाही पराभव झाला. त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. शाहू महाराजांच्या भूमीत आम्ही जातीयवाद मानणारे नाही,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

मी साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी लढत होतो. तुम्ही तुमच्या पोराबाळांना निवडून देण्यासाठी या ठिकाणी लढत होता. माझं पोरगं उभं नव्हतं. सामान्य माणसं या ठिकाणी उभी होती. बयाजी शेळकेसारखा धनगर समाजातील माणूस उभा होता. बाबासाहेब देवकरसारखा, ज्याने दहा वर्षांपूर्वी मल्टीशेटच्या लढ्यामध्ये बंटी पाटलांच्या उजव्या बाजूला राहून सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले होते, असा कार्यकर्ता या ठिकाणी उभा होता.

२५ पैकी २५ उमेदवार हे कार्यकर्ते म्हणून या निवडणुकीमध्ये उभे होते. या २५ कार्यकर्त्यांचे नेतृत्व मी करत असेन, तर माझे कार्यकर्ते निवडून आले पाहिजेत, ही भूमिका घेतली तर मग जातीयवाद कुठे आला, असा माझा प्रश्न आहे. मग जातीयवाद कसला? मी जातीयवाद करणारा नाही. शाहू महाराजांच्या पायाजवळ आम्ही बसलेलो आहोत. आम्ही जातीयवाद मानणारी मंडळी नाही.

मुश्रीफ साहेबांना मला सांगायचे आहे की, तुम्ही जातीयवादाचा आरोप केला. गेल्या चार महिन्यांत, निवडणुकीचा निकाल लागल्यापासून, तुम्ही ‘माझा मुलगा पडला’ असे चार वेळा म्हणालात. परंतु मातंग समाजाचा सुजित मिंचेकर पडला, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोललात? मराठा समाजाचे युवराज बापू पडले, त्यांच्याबद्दल काय बोललात? हे जर मी बोललो तर चालेल का? मी असे बोलत नाही, असे वाक्य वापरणार नाही. परंतु एका बाजूला तुम्ही माझ्यावर आरोप करता. या बंटी पाटलाने गेली २५-३० वर्षे काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली. सत्तेच्या दाराजवळ हा बंटी पाटील जाऊन बसला नाही, हे मला मुद्दामून सांगायचे आहे असे म्हणत सतेज पाटलांना पलटवार केला आहे.

चार तज्ज्ञ संचालकांच्या नावांवरून संताप

गोकुळमध्ये चार तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यासंदर्भातील अध्यादेशानंतर दुग्धविकास विभागाने शासन निर्णय काढल्याचा दावा पाटील यांनी केला. मात्र हा जीआर अधिकृत संकेतस्थळावर अपलोड झालेला नसल्याचे त्यांनी भाषणात सांगितले. शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, कृष्णात पाटील आणि अॅड. प्रशांत पाटोळे यांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यातील अॅड. प्रशांत पाटोळे हे सांगली जिल्ह्यातील असल्याचा मुद्दा उपस्थित करत पाटील यांनी संताप व्यक्त केला. “महायुतीला सांगलीतील माणूस मिळाला; पण गोकुळसाठी जाजम उचलणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात एकही पात्र माणूस किंवा दूध उत्पादक त्यांना मिळाला नाही का?” असा सवाल त्यांनी केला. महायुतीतील नेत्यांनी ज्यांना तिकिटे दिली, त्यांनाही या नियुक्त्यांमध्ये न्याय मिळाला नसल्याचे ते म्हणाले.

‘गोकुळला अमूलच्या धावणीला बांधण्याचा डाव’

गोकुळच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करताना पाटील यांनी अमूल आणि सरदार पटेल मिल्क फेडरेशनचा उल्लेख केला. “गोकुळला भविष्यात अमूलच्या धावणीला बांधण्याची ही सुरुवात आहे,” असा आरोप त्यांनी केला. सरदार पटेल मिल्क फेडरेशनच्या माध्यमातून देशातील दूध संकलन आणि दुग्धव्यवसायात मोठे बदल घडवण्याची योजना असल्याचा दावा त्यांनी केला.

देशात भविष्यात अमूल आणि मदर डेअरी असे दोनच मोठे ब्रँड ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच महानंदा आणि इतर दूध संघांबाबतही केंद्रस्तरीय संस्थांकडे व्यवस्थापन देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा पाटील यांनी केला. सहकार क्षेत्रातील स्थानिक संस्थांची स्वायत्तता धोक्यात येत असल्याचे ते म्हणाले. तर गोकुळची स्वायत्तता आणि कोल्हापूरची सहकार परंपरा टिकवण्यासाठी हा संघ कोल्हापूरच्याच नियंत्रणात राहिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘चार संचालकांना मतदानाचा अधिकार देऊ नका’

गोकुळच्या चेअरमन निवडीच्या प्रक्रियेवर बोलताना पाटील यांनी चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यास विरोध केला. या मुद्द्यावर न्यायालयात लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जर शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार दिला, तर निवडणुकीतून निवडून आलेल्या संचालकांच्या बहुमताला काय अर्थ उरणार? मग सहकारी संस्थांमध्ये थेट शासनानेच सदस्य पाठवून बहुमत तयार करायचे का?” असा सवाल त्यांनी केला.

चेअरमन निवडीच्या कार्यक्रमासाठी कोरमची आवश्यकता नसल्याचे आपले कायदेशीर म्हणणे असल्याचेही त्यांनी सांगितले. “ही नियमित बैठक नसून चेअरमन निवडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे कोरमचा मुद्दा येथे लागू होत नाही, अशी आमची भूमिका आहे,” असे पाटील म्हणाले. पुढील बैठकीला चार शासननियुक्त सदस्यांना पाठवू नये आणि निवडून आलेल्या संचालकांना चेअरमन निवडीची प्रक्रिया पूर्ण करू द्यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. आपल्याकडे बहुमत असतानाही सहकाराच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार करावा, अशी भूमिका आपण घेतली होती. मात्र दुसऱ्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असा दावाही त्यांनी केला.

‘२०२९ च्या सत्तांतराची सुरुवात कोल्हापुरातून’

गोकुळच्या मुद्द्यावरून राज्यभरातून आपल्याला पाठिंबा मिळत असल्याचे सांगत पाटील यांनी या संघर्षाला महाराष्ट्रव्यापी स्वरूप प्राप्त झाल्याचा दावा केला. “महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून लोकांचे फोन येत आहेत. कोल्हापूरकरांच्या संघर्षाला आमचे पाठबळ आहे, अशी भूमिका लोक घेत आहेत. या संघर्षामुळे सामान्य माणसाला लढलो तर जिंकू शकतो, हा विश्वास निर्माण झाला आहे,” असे ते म्हणाले. “कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्रातील सत्तांतराची बीजे रोवली गेली आहेत. २०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर होणार असून त्याची सुरुवात कोल्हापूरच्या भूमीतून झाली आहे,” असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना, चेअरमन निवडीच्या प्रक्रियेवरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT