Kolhapur Loksabha Election  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Loksabha Election 2024 : लोकसभेच्या मैदानात वस्तादांचा निघणार घाम; कोल्हापूर-हातकणंगलेत कसोटी

Rahul Gadkar

Kolhapur Political News : राज्यात शिवसेनेत बंडखोरी आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले. त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणात खास करून लोकसभा मतदारसंघात बदल झालेत. मागील लोकसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढलेल्या वस्तादांनी आता एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. आता याच वस्तादांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, लोकसभेत महायुती आणि आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी घाम निघणार आहे. शिवाय तिन्ही बाजूला तीन तोंडे असणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मने जुळवून मोट बांधण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही राज्यातील राजकारणाचा परिणाम झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अद्याप उमेदवारी निश्चित नसली तरी त्याची जबाबदारी ज्या त्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर आहे. मात्र, अद्यापही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. उमेदवार अजूनही गुलदस्त्यात आहे, पण वास्तविक पाहता महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याची प्रमुख जबाबदारी माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील यांच्यावरच असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंडलिक यांच्या विजयात पाटील यांचा हात

मागील लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी आघाडी धर्माला न जुमानता उघड उघड युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना विजयी करण्यात पाटील यांचा मोठा हात होता. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील प्रचारासाठी मैदानात होते.

यंदा मात्र हे चित्र वेगळे आहे. संजय मंडलिक यांना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची साथ मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील एकत्र असणार आहेत. सध्या महायुती व इंडिया (महाविकास) आघाडीत उमेदवारीवरून संभ्रम असला तरी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील या वस्तादांना घाम गाळवा लागणार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लोकसभेला सामोरे गेली होती. यंदा मात्र आमदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपले पुत्र प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. जर प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळाली तर स्वाभिमानी आणि महायुतीच्या विरोधात पुत्राला विजयी करण्यासाठी जयंत पाटील यांना कंबर कसावी लागणार आहे, तर महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमदार विनय कोरे यांच्याकडे येऊ शकते. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर धैर्यशील माने यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार आवाडे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

विधानसभेचा शब्द आणि लोकसभेला मदतीचा फंडा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी आपल्या विधानसभा निवडणुकीचे साधून घेताना दिसत आहेत. त्यात महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी आल्याने विधानसभेला इच्छुक असणाऱ्यांची घालमेल सुरू आहे. हीच परिस्थिती महाविकास आघाडीत आहे. जर लोकसभेला मदत हवी असल्यास विधानसभेचा शब्द आधी द्या! मगच पाठिंबा घ्या. असा पवित्रा अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी या वस्तादांची खरी कसोटी लागणार आहे.

लोकांची नाराजी आणि पक्षापेक्षा गटाला महत्त्व

शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर विद्यमान खासदार आणि आमदारांबाबत जनतेत नाराजी आहे. ही नाराजी दूर करून महायुतीतील नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. शिवाय कोल्हापूर व हातकणंगलेच्या राजकारणात पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्व आहे. या दोन्ही संघात पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, माजी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक यांना मानणारा वेगळा गट आहे. पण प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे राजकारण डोळ्यांसमोर ठेवून आखनी करावी लागणार आहे. कोणाला न दुखावता उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT