Pune, 06 February : बारामतीतील मागील कृषक प्रदर्शनात अजितदादा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे एकमेकांकडे पाहतसुद्धा नव्हते. ती गोष्ट दोघांवरही प्रेम करणाऱ्या सर्वांना खटकली आणि दादांच्या जवळच्या व्यक्तीकडे मी ते बोलून दाखवले. त्यानंतर १५ व्या दिवशी वसंतदादा शुगर इन्स्टियूटच्या वार्षिक सभेसाठी आलेले अजितदादा हेलिकॉप्टरमधून उतरून थेट साहेबांच्या खोलीत गेले आणि २० मिनिटे त्यांच्यासोबत राहिले. त्यानंतर त्या व्यक्तीचा मला फोन आला आणि म्हणाले, ‘अजितदादा विचारत होते की, तुमच्या दोस्ताला विचारलं का? की मी आज कसा वागलो?’ माझी काय औकात आहे हो, अशा शब्दांत शरद पवार यांचे ओएसडी राहिलेले सतीश राऊत यांनी अजितदादांची आठवण सांगितली.
राऊत म्हणाले, मी भोसरीमधील गव्हाणे वस्तीतील एका सामान्य पठारे चाळीत राहत होतो आणि अजितदादांची नव्वदच्या दशकात राजकारणात एन्ट्री झाली होती. त्या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघात भोसरीचा समावेश होता, त्यामुळे त्यांच्या कामाची धडाडी ही भोसरीतसुद्धा दिसायची. त्याच्या धडाडीचा एकदा साक्षात्कारही झाला. एकवेळ पुण्यातील रस्त्यांवर दिवे नसायचे; पण मी राहत असलेल्या पठारे चाळीतील गल्लीतसुद्धा सोडियम वेफअरचे दिवे होते. त्यामुळे अजितदादांची (Ajit Pawar) कामाची धडाडी मी नव्वदीच्या दशकापासून पाहत आलेलो आहे.
कधी वाटलं नव्हतं की, पवार कुटुंबीयांशी माझा इतका जवळचा संबंध येईल. जेव्हा मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे रुजू झालो. अजितदादांची धडाडी असली तरी ती लांबून धडकी भरवणारी वाटते, त्यामुळे दादांच्या जवळ जाण्याचे धाडस नसायचं. पण मी साहेबांची इमाने इतबारे सेवा करतो, याचं अजितदादांना मोठं अप्रूप होतं. त्याचा साक्षात्कार मला फार उशिरा झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, अजितदादा हे साहेबांच्या खोलीत जायचे, तेव्हा ते फार वेगाने जायचे. त्यांना नमस्कार करेपर्यंत ते खोलीत पोचलेले असायचे. इतकी धडाडी त्यांच्यामध्ये असायची. त्यामुळे आपण त्यांच्या गिनतीत आहोत की नाही, याची मला भ्रांत असायची. एक दिवस आमदारांचा मला फोन आला, तुमच्याविषयी अजितदादा फार चांगलं बोलत होते, असे ते मला सांगत होते. मला उत्सुकता होती की मी नमस्कार करेपर्यंत दादा निघून जातात, त्यामुळे आपली मोजदाद त्यांच्याकडे आहे का?
पीएसंदर्भात विषय निघाल्यावर आमदार, मंत्र्यांना त्यांचे पीए कसे अडचणीत आणतात, हे दादा सांगत होते. माझ्या कारर्किदीत मी चार-पाच चांगले पीए पाहिले. त्यात त्यांनी किशोरराजे निंबाळकर यांचं नाव घेतलं. त्यानंतर आमच्या साहेबांकडे आहेत, ते राऊत. म्हणजे मी दोन मिनिटसुद्धा त्यांच्यासमोर कधी उभा राहिलो नव्हतो. पण आपल्या कामाची पारख दादा हे लांबून करत होते, हा माझ्यासाठी मोठा विश्वास आणि प्रोत्साहन होतं, असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, आमदारकीचे तिकिट किंवा मंत्रिपदाची यादी असेल तर मला स्वतःला चांगले टायपिंग येत असल्याने मीच त्या याद्या टाईप करायचो. त्यामुळे क्लार्कलाही त्यातील नावं माहिती नसायची. मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या आमदाराला वाटलं की हे राऊत यांना माहिती असेल. त्यामुळे त्यांनी अजितदादांना मंत्रिपदाच्या यादीबाबत विचारलं. तेव्हा दादा त्यांना म्हणाले, राऊत यांना सगळं माहीत असलं तरी हे आपल्याला सांगणार नाहीत. म्हणजे सचोटीचा सन्मान करणारा एवढा मोठा नेता आम्ही दुसरा पाहिलेला नाही.
मी जेव्हा साडेसोळा वर्षांच्या शरद पवार यांच्यासोबतच्या सेवेतून माझ्या डिपार्टमेंटमध्ये येत होतो, त्यावेळी माझे पाठीराखा हे अजितदादाच होतं. अजितदादांनी सांगितलं होतं की मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळे अधिकारी द्यायचा असेल मी सतीश राऊत यांना देतो आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विशेष विनंती केली आणि त्यांनीही ती मान्य केली. त्यांच्या कृपेमुळेच मी आज पाहिल्या रांगेतील खुर्चीवर बसलो आहे, हेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, सगळ्यांना वाटतं की अजितदादा फार कडक होते. पण कडक माणूस निष्ठूर कधीच नसतो. तो प्रचंड भावनाविवश असतो. एकदा मी आणि अजितदादा दोघं बसलेलो होतो. दादा त्यांच्या मनातील सगळं बोलून दाखवायचे. मी म्हटलं साहेबांवर तुम्ही कितीही बोलत असला तरी एकदा गदिमा सभागृहात साहेबांवर सभा होती, त्यावेळी तुम्हाला साहेबांकरिता आवंढा गिळताना पाहिलं आहे. असे बोलल्यावर रागाने आणि त्वेषाने बोलणारे दादा एकदम शांत झाले. त्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्या काकांविषयी वाटणारा उमाळा त्यांच्या चेहऱ्यावर मी पुन्हा एकदा पाहिला.
मी शासकीय सेवेत असलो तरी पवार कुटुंब एकत्र राहावं, अशी माझी धडपड असायची आणि दादांनी माझ्या शब्दाला त्यावेळी मान दिला होता. बारामतीत कृषक प्रदर्शनात दादा आणि साहेब एकमेकांकडे पाहतसुद्धा नव्हते. ते या दोघांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना खटकलं. त्यावर मी दादांच्या जवळच्या व्यक्तीला म्हटलं की, बारामतीचे लोक दादा आणि साहेबांवर प्रचंड प्रेम करतात. पण, दोघांनी एकमेकांकडे पाहिलंसुद्धा नाही, याचं कसंतरीच वाटलं. त्यानंतर १५ व्या दिवशी अजितदादा हे वसंतदादा शुगर इन्स्टियूटमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरले आणि थेट साहेबांच्या केबिनमध्ये गेले, त्या ठिकाणी ते वीस मिनिटं बसले. त्यानंतर वार्षिक सभेतही ते साहेबांशी मनमोकळपणे बोलले, ते पाहून माझ्या मनाला बरं वाटलं, अशी आठवण राऊत यांनी सांगितली.
ते म्हणाले, अजितदादा तेवढ्यावर थांबले नाही, दादा किती ग्रेट होते हे सांगतो आणि मी थांबतो. रात्री त्या व्यक्तीचा मला फोन आला आणि म्हणाले, अजितदादा विचारत होते की, तुमच्या दोस्ताला विचारलं का? मी आज कसा वागलो? माझी काय औकात आहे हो. मी फक्त मनातलं बोलून दाखवलं आणि त्यांनी ते लक्षात ठेवलं. १५ दिवसांनंतर ते साहेबांशी बोलले आणि सायंकाळी मला पोचपावती दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.