Umesh Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP News : अजितदादांच्या राष्ट्रवादीत उमेश पाटलांना बढती...

Vijaykumar Dudhale

Solapur News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. पाटील यांची राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी आता पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे. (Selection of Umesh Patil as Chief Spokesperson of NCP)

आमदार अमोल मिटकरी यांच्याकडील मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून ती अजित पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातील निकटवर्तीय उमेश पाटील यांच्यावर सोपवली आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून कृषी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय वाटचालीस सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेश पाटील हे २०११ मध्ये राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले. वयाच्या २९ व्या वर्षी उमेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. एकेक करीत राष्ट्रवादीत महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत.

राष्ट्रवादीने २०१२ मध्ये उमेश पाटील यांना युवकचे प्रदेशाध्यक्षपद केले होते. त्याच वर्षी पाटील यांना पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आले होते. अनेक राजकीय वादळात उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि पवार कुटुंबीयांची बाजू लावून धरली. विशेषतः वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये भूमिका मांडताना होणारे आरोप उमेश पाटील यांनी मुद्देसूद मांडणी करून खोडून काढल्याचे अख्ख्या महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे. ते काम उमेश पाटील आजपर्यंत करीत आले आहेत.

विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याच्या प्रभारीपदाची अवघड जबाबदारीही पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांनी गावितांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची नंदुरबारमध्ये जोरदारपणे खिंड लढवली. एकीकडे राज्यस्तरावर काम करीत असताना उमेश पाटील यांनी नरखेड जिल्हा परिषद गटातून निवडणुकीचे राजकारणातही नशीब आजमावले. विशेष म्हणजे पाटील हे मोठ्या मताधिक्क्याने नरखेड गटातून सोलापूर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्याबरोबरच एकत्रित राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्षपदही पक्षाने उमेश पाटील यांच्याकडे २०१७ मध्ये सोपवले होते. जिल्ह्यातील अनेक भागांत फिरून पक्षवाढीसाठी त्यांनी प्रयत्न करीत कार्याध्यक्षपदाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या मेळाव्यातही त्यांच्या नांदेड जिल्ह्यातील सभेची जबाबदारी दिली होती. महायुतीच्या त्या सर्व यादीमध्ये मंत्री होते, त्यामध्ये पाटील यांना अजित पवार यांनी संधी दिली होती.

दरम्यान, अजित पवार यांनी उमेश पाटील यांना आणखी मोठी संधी देत पक्षात त्यांची बढती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते म्हणून पाटील यांची निवड करण्यात आली आहे. म्हणजेच पाटील यांना पक्षाची अधिकृत भूमिका मांडावी लागणार आहे. मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याचे पत्र पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT