Madha Loksabha Constituency  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Loksabha Constituency : माढ्याचा तिढा सुटणार...भाजपचा बडा नेता उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

BJP News : या नावांमध्ये सर्वमान्य होईल, असे नाव भाजपकडून पुढे आले आहे. संबंधित नेत्याला माढ्यातून लोकसभेला उतरविले तर मोहिते पाटील यांच्यासह रामराजेंचाही होकार मिळेल, अशी अपेक्षा भाजपला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : माढा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी ठरला आहे. उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा असतानाच आता मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मतदारसंघावर दावा केला जात आहे, त्यामुळे माढा मतदारसंघासाठी भाजपकडून आत मोठे नाव पुढे आले आहे. मोहिते पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपने हुकमाचे अस्त्र बाहेर काढले आहे. या नावाला मोहिते पाटलांसह मित्रपक्षांचीही संमती मिळू शकते, त्यामुळे भाजपचे हायकमांड या नावावर शिक्कामोर्तब करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ देशभर चर्चेत असतो. मात्र, हाच माढा भाजपसाठी सध्या अडचणीचा मुद्दा ठरला आहे. कारण गेल्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये या वेळी तीव्र चुरस आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांकडून कडाडून विरोध होताना दिसत आहे. शिवाय पारंपरिक विरोधक रामराजेंचाही निंबाळकरांना विरोध आहे. भाजपचे (BJP) जिल्हा संघटक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा (Madha) लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. त्यांनी मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्याही पूर्ण केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते पाटील (Mohite Patil) यांच्यासोबतच आता माढ्यावर महायुतीमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला आहे. त्यासाठी रामराजे आग्रही आहेत. माढ्याच्या शिंदे बंधूंनीही तशी मागणी पक्षप्रमुख अजित पवार यांच्याकडे केली आहे. पक्षांतर्गत स्पर्धा असतानाच आता मित्रपक्षानेही माढ्यावर दावा केल्याने भाजपची कोंडी होत आहे. मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपला मोहिते पाटील यांना दुखावून चालणार नाही, त्यामुळे पक्षाकडून इतर नावांची चाचपणी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

या सर्व नावांमध्ये सर्वमान्य होईल, असे नाव भाजपकडून पुढे आले आहे. संबंधित नेत्याला माढ्यातून लोकसभेला उतरविले तर मोहिते पाटील यांच्यासह रामराजेंचाही होकार मिळेल, अशी अपेक्षा भाजपला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील या बड्या नेत्याला दिल्लीला पाठविण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. हा नेता भाजप हायकमांडच्या वर्तुळातील असून, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास माढ्याचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील या बड्या नेत्यासह दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याही नावाची चाचपणी केली जात आहे. देशमुख यांनी या मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. याशिवाय प्रशांत परिचारक यांचेही नाव चर्चिले जात आहे. पण, माढ्याचा तिढा सोडविण्यासाठी भाजप हायकमांडकडून संबंधित बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या नेत्याचा होकारही तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT