Nanded News : भाजपला मिशन 45 यशस्वी करण्यासाठी नांदेडची जागा पुन्हा जिंकावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते. आत्ता गेल्या वेळेस पराभूत झालेल्या अशोक चव्हाण यांना या वेळी नांदेडच्या विजयाची गॅरंटी द्यावी लागणार आहे. किंबहुना याच कामासाठी त्यांना भाजपत प्रवेश देण्यात आला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संभाजीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत नुकतीच भाजपची सभा पार पडली. या सभेत मराठवाड्यातील आठ लोकसभा जागांवर महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी संकल्प केला आहे. नांदेड जिल्ह्यातील राजकारणात गेली दोन दशके अशोक चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर (Pratap Patil chikhlikar) यांच्यातील राजकीय वैर सर्वज्ञात आहे. आता हे दोन कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर एकत्र दिसत आहेत. तसेच, आमच्यातील कटुता संपली आहे, असे सांगत आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकजुटीने काम केले, तर नांदेडचा विजय सोपा होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचे लक्षात येताच पक्षाने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश करून घेतला. पक्षाने चव्हाणांना तातडीने राज्यसभेत पाठवून खासदार केल्याने त्यांच्यावर आता ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून नांदेडच्या विजयाची गॅरंटी द्यावी लागणार आहे.
गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना चार लाख ४० हजारांच्यावर मते मिळाली होती. यात पक्षाची मतं, व्यक्तिगत मतांचा समावेश होता. काॅंग्रेसमध्ये असताना चव्हाणांवर नांदेडची सर्व प्रकारची जबाबदारी असायची. तसेच, निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी ते ओळखले जातात. आता हेच काम त्यांना भाजपत करावे लागणार आहे. भाजपत प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाणांनी नांदेड जिल्ह्यातील काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात आणले. पण, दलित व मुस्लिम नेते भाजपत आले नाहीत. त्यांचे मन वळवून भाजपला सहकार्य करण्याचे आव्हान अशोक चव्हाण यांच्या समोर आहे.
गेल्या निवडणुकीत त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात चव्हाण यांना लोकसभेला ८५ हजार मते मिळाली होती, तर चिखलीकरांना ८० हजार मते मिळाली होती. आत्ता हे दोन्ही नेते एकाच पक्षात आहेत, त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला या मतदारसंघातून जास्त मताधिक्याची अपेक्षा राहणार आहे.
नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळाले नव्हते. या दोन्ही मतदारसंघांत अशोक चव्हाणांचे समर्थक खूप मोठ्या संख्येने आहेत. शिवाय नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे शिंदे गटात आहेत. ही राजकीय परिस्थिती पाहता या दोन्ही मतदारसंघांत भाजपला चांगले मताधिक्य मिळण्यासाठी अशोक चव्हाणांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
नायगाव, देगलूर, मुखेड या तीनही विधानसभा मतदारसंघांत भाजपला गेल्या निवडणुकीत खूप मोठे मताधिक्य मिळाल्याने चिखलीकरांचा विजय झाला होता. गेल्या वेळेस जी राजकीय परिस्थिती होती, तीच परिस्थिती सध्या आहे, त्यामुळे गेल्या निवडणुकीत जे मताधिक्य मिळाले होते, ते टिकून ठेवण्यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागणार आहेत.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळाले, असे चित्र निर्माण झाले आहे. पण, हे चित्र वास्तवात आणण्यासाठी अशोक चव्हाण यांना खासदार चिखलीकर, जिल्ह्यातील भाजपचे चार आमदार, जुने व नवे पदाधिकारी यांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे, तरच विजय संपादन करता येईल. नांदेड सोबतच लातूर, हिंगोली या दोन मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाची गॅरंटीसुद्धा अशोक चव्हाण यांनाच घ्यावी लागणार आहे. पण, त्यांच्या विजयाची गॅरंटी कोणत्या उमेदवाराला मिळणार, हे तितकेच महत्त्वाचे आहे.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.