Dudh Pandhari election meeting
Dudh Pandhari election meeting sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दूध पंढरीचा आखाडा : आमदार संजय शिंदेंच्या फार्महाऊसवरील बैठकीला परिचारकांची हजेरी

संतोष पाटील

टेंभुर्णी (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्हा दूध संघाची (दूध पंढरी, Dudh Pandhari) निवडणूक बिनविरोध करण्याच्या निमित्ताने भाजपचे माजी आमदार आणि एकेकाळाचे अत्यंत जवळचे मित्र प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या माढा तालुक्यातील नगोर्ली येथील फार्महाऊसवर हजेरी लावली. संघाच्या निवडणुकीसंदर्भातील पहिल्या तीन बैठकांना हे दोन्ही नेते गैरहजर होते. दूध संघ बिनविरोध करण्याबाबत सुमारे चार तास चालेल्या या बैठकीला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. त्यामुळे संघाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Senior leaders discuss on Dudh Pandhari election at Sanjay Shinde's farmhouse)

दरम्यान, शुक्रवारी (ता. ४ फेब्रुवारी) रात्री झालेल्या बैठकीत जिल्हा दूध संघ बिनविरोध करण्यावर सुमारे चार तास चर्चा होऊन 12 फेब्रुवारी रोजी पुन्हा ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार संजय शिंदे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक हे दोघे अनेक दिवसांनंतर एकत्र आले होते.

या बैठकीस आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, दीपक साळुंखे, सिद्धाराम म्हेत्रे, चंद्रकांत देशमुख, बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे, भगिरथ भालके आदी उपस्थित होते.

जिल्हा दूध संघ बिनविरोध करण्यासाठी या अगोदर तीन वेळा बैठक झाली आहे. पहिली बैठक ही उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्महाऊसवर पार पडली. त्यानंतर दुसरी बैठक मोहोळ तालुक्‍यातील अनगर येथील माजी आमदार राजन पाटील यांच्या लोकनेते बाबूरावअण्णा पाटील साखर कारखान्यावर झाली. त्यानंतर मंगळवेढा येथे एक बैठक घेण्यात आली होती.

या तीनही बैठकांना आमदार संजय शिंदे व माजी आमदार प्रशांत परिचारक हे दोघेही गैरहजर होते. परंतु शुक्रवारी सायंकाळी नगोर्ली (ता. माढा) येथील बैठकीस हे दोन्ही नेते उपस्थित राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसते. सायंकाळी सहापासून रात्री दहापर्यंत ही बैठक सुरू होती. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक 26 फेब्रुवारी रोजी निवडणूक आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख १५ फेब्रुवारी आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने दूध संघ बचाव समितीसोबत आमदार बबनराव शिंदे, दिलीप सोपल व प्रशांत परिचारक यांनी चर्चा करावी आणि 12 फेब्रुवारी रोजी पुन्हा ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याचे ठरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT