Shivendraraje Bhosale -Shashikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : शिवेंद्रराजेंनी निवडणुकीआधीच गेम फिरवला; सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महत्वाची घडामोड...

Shivendraraje Bhosale Vs Shashikant Shinde : सातारा जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी जावळीतील दोन सहकारी सोसायट्यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या बाजूने ठराव केल्याने शशिकांत शिंदे यांना राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 27 July : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक येत्या तीन महिन्यांत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सहकारी सोसायट्यांकडून मतदानासाठी ठराव करण्यात येत आहेत. जावळी तालुक्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात ठरावावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहेत. मात्र, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीआधीच शशिकांत शिंदेंना जोरदार धक्का बसला असून हक्काच्या दोन सोसायट्यांनी भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या नावाने ठराव केले आहेत, त्याचा शिंदेंच्या जिल्हा बॅंकेतील ‘एन्ट्री’वर किती परिणामकारक ठरतो, हे पाहावे लागणार आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर मेढा सेंटर विकास सेवा सोसायटीत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या गटांमध्ये ठरावावरून जोरदार राजकीय चुरस रंगली. अखेर शिवेंद्रराजे यांच्या गटातील डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला.

जावळी तालुक्यातील महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या मेढा सेंटर विकास सेवा सोसायटीत १२ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील बहुतांश सोसायट्यांवर शिवेंद्रसिंहराजे गटाचे वर्चस्व असताना मेढा सेंटर विकास सेवा सोसायटी मात्र त्यांच्या विरोधी शिंदे गटाकडे गेली होती. मात्र, गेल्या तीन वर्षांत शिंदे गटातील काही संचालक आपल्या बाजूने वळविण्यात शिवेंद्रसिंहराजे गटाला यश आले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ठरावासाठी झालेल्या सभेत डॉ. रामदास वांगडे यांना सूचक म्हणून सुरेश दळवी, तर अनुमोदन पुंडलिक पार्टे यांनी दिले, तर विरोधी गटाकडून सचिन जवळ यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना आनंदराव सुतार सूचक, तर गणपत गोरे यांनी अनुमोदन दिले. आठ विरुद्ध पाच मतांनी डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर झाला आहे.

आतापर्यंत ३४ विकास सेवा सोसायट्यांचे ठराव झाले असून, १५ सोसायट्यांचे ठराव अजून होणार आहेत. निवडणुकीचा कालावधी तीन महिने असून, भविष्यात अजून बऱ्याच घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

शिवेंद्रराजेंनी हिसकावल्या दोन सोसायट्या

जावळी तालुक्यातील मेढा व गांजे गावच्या सोसायटीच्या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या पॅनेलचा पराभव झाला होता. मेढा सोसायटीत डॉ. रामदास वांगडे हे एकमेव उमेदवार निवडून आले होते.

गांजे सोसायटीतही पराभव झाला होता, तरीही निवडणुकीनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली जादू दाखवत या सोसायटीमधील विरोधी संचालकांना आपलेसे करत दोन्ही सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने केल्याने विरोधकांना धक्का बसला आहे. मेढ्यात तर त्यांच्या पॅनेलमधून एकमेव निवडून आलेले डॉ. रामदास वांगडे यांचा ठराव घेऊन भविष्यातील फोडाफोडीला पूर्णविराम दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT