Shahajibapu Patil-jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ShahajiBapu Vs Gore : जयकुमार गोरेंचा पलटवार; ‘शहाजीबापू, दुसऱ्याला दोष देताना आपण काय केलंय, हे बघितलं पाहिजे’

Sangola Nagar Parishad Election 2025 : सांगोला निवडणुकीत भाजपने शिवसेनेला वगळून शेतकरी कामगार पक्षाशी युती केली आहे. त्यामुळे शहाजीबापू पाटील संतापले असून जयकुमार गोरे यांनी त्यांना थेट उत्तर दिले आहे.

Vijaykumar Dudhale

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेनेऐवजी शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्याने शहाजीबापू पाटील नाराज झाले आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापूंनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देताना त्यांच्या टीकेला उत्तर दिले.

गोरे यांनी मारुती आबा बनकर या सक्षम, निष्कलंक चेहऱ्याला उमेदवारी देण्यामागील कारणे सांगत, सांगोल्यात गेल्या पाच वर्षांत अपेक्षित विकास न झाल्याची टोचणी दिली.

Solapur, 20 November : सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महायुतीमधील शिवसेनेला वगळून शेतकरी कामगार पक्षाशी युती केली आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेसलाही घेतले आहे, त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेली दोन दिवसांपासून भाजपवर विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर हल्लाबोल चालवला आहे. त्याला गोरे यांनी उत्तर दिले आहे. ‘शहाजीबापू, दुसऱ्याला दोष देताना आपण काय केलं आहे, हे तपासून पाहिलं पाहिजं,’ असा सल्ला त्यांनी माजी आमदार पाटील यांना दिला आहे.

पालकमंत्री गोरे म्हणाले, शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना भाजपला टार्गेट केलेले आहे. त्यांनी स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केलेले आहे.

सांगोल्याची परिस्थिती शहाजीबापूंनी समजून घ्यायला हवी. त्यांनी सर्वांच्या सोबत बसून चर्चा करून नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषिक करणे अपेक्षित होतं. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा करून त्यानंतर आघाडी किंवा युती झाली पाहिजे, अशी भूमिका मांडणं, हे उचित नाही. त्यामुळे सांगोल्यात जी परिस्थिती होती. वातावरण तिथं होतं. त्या अनुषंगाने आम्ही काही निर्णय घेतले आहेत, असेही जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, मारुती आबा बनकर यांच्यासारखा एक सक्षम उमेदवार आम्ही सांगोला शहराच्या नागरिकांपुढे दिलेला आहे. सांगोल्यातील नागरिक त्यांना चांगले ओळखतात. एवढी वर्षे राजकारणात असणारा ते निष्कलंक चेहरा आहेत. त्यांचे सर्व समाजाशी चांगले संबंध आहेत. त्यांना उमेदवारी देताना सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहाजीबापूंचा त्रागा का आहे, हे त्यांना विचारा.

कोणतीही गोष्ट करताना आपण सर्वांना विश्वासात घेऊन केली पाहिजे. हे मी सांगण्याइतपत शहाजीबापू काही छोटे नाहीत, ते ज्येष्ठ आहेत. त्यामुळे या संदर्भात त्यांनी आत्मपरीक्षण करावं. दुसऱ्याला दोष देताना आपण काय केलं आहे, हे तपासून पाहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी शहाजीबापूंना दिला.

ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत ज्या पद्धतीने पैसे आले, त्यातून त्या पद्धतीची विकासकामे व्हायला पाहिजे होती. ती विकासकामं झाली नाहीत. त्याला कारण आहे, याचं उत्तरही त्यांनी दिलं पाहिजे. गेली पाच वर्षे त्यांच्याकडे सत्ता असताना जो बदल सांगोल्यात होणे अपेक्षित होतं, तो बदल झालेला नाही. त्याचं आत्मपरीक्षण शहाजीबापू पाटील यांनी केलं पाहिजे.

शहाजीबापू यांनी आता जे उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी पाच वर्षे कारभार केला आहे, त्याचे विश्लेषण करताना एवढे पैसे आल्यानंतरसुद्धा सांगोला शहरात विकास का दिसत नाही किंवा विकासकामांचा दर्जा का दिसत नाही. यासंदर्भात चर्चा होणे आवश्यक आहे. कुणाचं तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसावी, ती शहराच्या विकासाची असावी, असेही जयकुमार गोरेंनी स्पष्ट केले.

प्र.1 — भाजपने शिवसेनेला वगळून कोणाशी युती केली?
→ शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत.

प्र.2 — शहाजीबापू पाटील का नाराज आहेत?
→ नगराध्यक्ष उमेदवार निवड प्रक्रियेत त्यांना डावलण्यात आल्यामुळे.

प्र.3 — भाजपने कोणाला उमेदवारी दिली आहे?
→ मारुती आबा बनकर.

प्र.4 — पालकमंत्री गोरेंची मुख्य टीका काय आहे?
→ गेल्या पाच वर्षांत सत्तेत असतानाही सांगोल्यात विकास घडवण्यात अपयश.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT