shambhuraj desai-jaykumar gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमाला शंभूराज देसाईंची उपस्थिती; जयकुमार गोरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

Devendra Fadnavis Satara Tour : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमागची माहिती जयकुमार गोरे यांनी उघड केली.

Vijaykumar Dudhale

Satara, 15 May : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वितुष्ट आले होते, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई येणार का, याची चर्चा रंगलेली असतानाच देसाई यांच्या कार्यक्रमाला असलेल्या उपस्थितीमागची इनसाईड स्टोरी खुद्द ग्रामविकास मंत्री तथा कार्यक्रमाचे आयोजक जयकुमार गोरे यांनी सांगितली.

जयकुमार गोरे म्हणाले, शंभूराज देसाई आणि मी आपापल्या पक्षाचं काम करत आहोत. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचा व्हावा, अशी माझी भूमिका होती. कारण आमचे सदस्य सर्वाधिक होते. आम्ही सर्वांनी मिळून भाजपचा अध्यक्ष केला, त्यामुळे शंभूराज देसाई यांना दुःख होणं साहजिक आहे. राजकारणात अशा गोष्टी होत असतात.

आम्ही दोघंही आमचा पक्ष वाढवत असलो तरी आम्ही दोघंही एकाच मंत्रिमंडळातील सहकारी आहोत. आमचे दोघांचेही चांगले संबंध असून एकमेकांचे मित्रही आहोत. शंभूराज देसाई यांनी कधीच कुठल्या कार्यक्रमाला मला फोन करून बोलावलं नसलं तरीसुद्धा मी स्वतः शंभूराज देसाई यांना फोन केला. माझ्या लोकांनाही निमंत्रण घेऊन पाठवलं होतं. तसेच, मी स्वतः फोन केला होता आणि आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते, असेही जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, मी शंभूराज देसाई यांचं अभिनंदन, आभार मानून कौतुक करतो की, त्यांनी माझ्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि पालकमंत्रिपदाचं दायित्व त्यांनी कार्यक्रमाला येऊन पार पाडलं. आमचे ते पालकमंत्री आहेत. आम्ही सर्वजण एकत्र काम करतो.

महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यातील फारकत मिटविण्यासाठी प्रयत्न केले का, यावर जयकुमार गोरे म्हणाले, राजकारणातील कोणतीही गोष्ट ही तात्पुरती असते. ती चिरकाल नसते. एकमेकांना दुखावणं, एकमेकांच्या विरोधात काही गोष्टी होणं, हे राजकारणात सातत्याने हेात असतं. एकदा ती गोष्ट घडून गेल्यानंतर ते काय बांध-भावाचं वैर नसतं, जे की आयुष्यभराचं असतं. त्यामुळे त्या परिस्थितीतून आपण पुढे गेलेलो आहोत.

जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड आता झालेली आहे. आपण त्याच्या पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे सर्वजण एकत्र येतील आणि पूर्वीप्रमाणे सर्वजण काम करतील. त्यात कोणतीही शंका नाही. शेवटी एकत्र येण्यासाठी थोडासा वेळ लागतो, तो लागेल, असे गोरे यांनी देसाई आणि महेश शिंदे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT