Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai News : देसाईंच्या मतदारसंघात होणार 297 किलोमीटरचे पाणंद रस्ते; विरोधकांकडून टक्केवारीचा आरोप

Shambhuraj Desai Patan Vidhansabha News : पाटण विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 135 गावांतील 209 किलोमीटर लांबीच्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली होती.

Vishal Patil

साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामधील शेत पाणंद रस्ते अरुंद व दुरुस्त करण्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतून तब्बल 297 किलोमीटरचा रस्ता तयार होणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांच्या मतदारसंघातील 151 गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या शेतातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार व शासन निर्णय पारित झाल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.  

शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या ‘मातोश्री’ ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare ) यांच्याकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार पाटण मतदारसंघातील कामांचा समावेश 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखड्यामध्ये करून मंजुरी देण्यात आली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघ पाटण, ढेबेवाडी, तारळे, कोयना, मोरगिरी, मल्हारपेठ आणि सुपने- तांबवे भागात विभागला जात असून, सर्वच भागातील गावातील पाणंद रस्त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न मंत्री देसाई यांनी केला आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री देसाई ( Shambhuraj Desai ) म्हणाले, “शासन सर्वसामान्यांचे तसेच शेतकऱ्यांचे आहे. पाटण तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात शेतकरी शेती करत असून, त्यांना ये-जा करण्यासाठी अडचण होत आहे. आजपर्यंत शेतकरी अडचणीत होता. पण, आता आपलं सरकार पाणंद रस्ते, विविध योजना मंजूर करत शेतकऱ्यांबरोबर आहे. माझ्या पाटण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी जे काही काम करता येईल ते मी करत राहणार आहे.” 

पाटण मतदारसंघातील 506 किमी पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी

पाटण विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 135 गावांतील 209 किलोमीटर लांबीच्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. आता या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखड्यांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 151 गावांतील तब्बल 297 कि.मी लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आल्याने एकूण 356 गावांतील 506 किलोमीटरचा रस्त्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ डोंगरदऱ्यात विखुरलेला असून, डांबरी रस्त्याबरोबर आता शेतातील रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात निधी टाकून विक्रमी मताधिक्य घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. मंत्री देसाई यांच्याकडून निधी आणल्याचे सांगितले जात आहे. पण, केवळ निधीची घोषणा केल्या जात असून, टक्केवारीचा आरोप विरोधकांनी केला आहे. या आरोपांमुळे पाटण तालुक्यात विकासकामांवरूनही राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT