Kolhapur News : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. दोन्ही गट संधी मिळताच एकमेकांवर निशाणा साधत असतात. कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे दोन दिवसीय महाअधिवेशन होत आहे. या निमित्ताने उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
येत्या काळात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने राज्यातील वातावरण तापणार आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ठाण्यात मुक्कामाला जरी आले तरी एकनाथ शिंदे यांना काहीच फरक पडणार नाही. येत्या काळात ठाकरे पिता-पुत्रांनी ठाण्यात येऊन शिंदे यांच्यावर कितीही टीका केली तरी काहीही फरक पडणार नाही. ठाण्यातील जनता शिंदे यांच्या पाठीशी उभी असल्याचे यावेळी शंभुराज देसाई यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी आधी कल्याणमध्ये दौरा केला. तेव्हा 170 माणसा तिथे होती आणि दुसऱ्या ठिकाणी 300 च्या आसपास माणसे आली होती. तिसऱ्या ठिकाणी पाचशे लोक आले होते. त्यांना वाटते सारखे आल्यानंतर संख्या वाढेल. पण संख्या कमी होत असल्याचा अनुभव त्यांना आला असल्याचे यावेळी देसाई म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एवढे मोठे महाअधिवेशन त्यांना कधी घेता आले नाही. असं अधिवेशन त्यांनी कधी घेतलं हे त्यांनी सांगावं. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात असं कधी कोणाला बोलता आलं का? हे सामान्य शिवसैनिकाचे महाअधिवेशन आहे, असं म्हणत शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संपूर्ण देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जागतिक मान्यता प्राप्त असणारा नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. संजय राऊत यांचा संविधानावर विश्वास आहे ना? संजय राऊत (Sanjay Raut) हे आमच्या मतावर खासदार झाले असल्याचा आरोप शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केला.