Gadakh Sharad Pawar : Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : शंकरराव गडाखांची सावध भूमिका, नगर दक्षिण लोकसभेसाठी 'मविआ'चा उमेदवार कोण ?

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपने मिशन '45 प्लस' लक्ष्य ठेवत तयारी सुरू केली आहे. मात्र, मविआमध्ये राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार आणि पक्ष यावरून अजून स्पष्टता पुढे आलेली नाही. अशात नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी आघाडीचा उमेदवार अद्याप स्पष्ट नाही. चर्चेत नाव आलेले नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी माझे नाव चर्चेत असले तरी पक्षाकडून विचारणा झाल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू, असे सांगत सावध भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

आमदार शंकरराव गडाख राष्ट्रवादीकडून न लढता 2019 ला अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी तत्पूर्वी क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली आहे. शरद पवार यांचे गडाख कुटुंबाशी असलेल्या जवळकीतून राष्ट्रवादीने नेवाशातून उमेदवार दिला नव्हता. तेव्हा भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांचा जवळपास 31 हजार मतांनी पराभव करत गडाख निवडून आले.

मात्र, 2019 ला विधानसभेचे निकाल बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांनी केला. यात अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शंकरराव गडाख यांनी हातात राष्ट्रवादीचे घड्याळ न बांधता शिवसेनेचे शिवबंधन बांधले आणि मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीही झाले.

आता काही मागील वर्षी एकनाथ शिंदे आणि नुकतेच अजित पवारांनी केलेल्या राजकीय भूकंपात आमदार गडाख यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेची साथ सोडलेली नाही. तसेच, राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या तयारीला लागलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके अजित पवार गटात गेल्याने 2024 लोकसभा निवडणुकीसाठी आमदार शंकरराव गडाखांचे नाव दोन महिन्यांपासून चर्चेत आले आहे.

यावर आता गडाखांनी ऑन कॅमेरा पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट करताना, बदलत्या विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये आपल्या उमेदवारीची चर्चा होत असल्याचे मान्य केले आहे. नेते आणि जनतेत कार्यकर्ता हा महत्त्वाचा दुआ असतो, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पक्ष निरीक्षक आमदार सुनील शिंदे यांनी होणाऱ्या चर्चेवर आपल्याशी चर्चा केल्याचे गडाखांनी मान्य केले आहे.

असे असले तरी पक्ष वरिष्ठ यांनी याबाबत विचारणा केली नसल्याचे सांगत गडाखांनी ज्यावेळी विचारणा होईल, त्यावेळी निर्णय घेऊ असे सांगत आपली भूमिका गुलदस्तात ठेवली आहे. शंकरराव गडाखांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आल्याने अनेकांना आता 1991 ला बाळासाहेब विखे विरुद्ध यशवंतराव गडाख यांच्यात न्यायालयीन लढाईमुळे देशभर गाजलेली निवडणूक डोळ्यांसमोर आली आहे. असे झाल्यास 27 वर्षांनंतर पुन्हा विखे-गडाखांचे वारसदार खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार शंकरराव गडाख अशी लढत होईल का, याची उत्सुकता जिल्ह्यात दिसून येत आहे.

गडाख कुटुंब शरद पवारांच्या जवळचे मानले जाते. मात्र, गडाख सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत, तर नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादी पक्षानेच सातत्याने लढवली आहे. त्यामुळे शरद पवार आपल्याकडे असलेली जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडतील का? हाही सध्या मोठा प्रश्न आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT