Asmita Gaikwad-Sharad Kaoli Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Shivsena News : ठाकरेंनी शेतकऱ्याच्या पोराला बनविले उपनेते; सोलापुरातून दोघांची वर्णी

Vijaykumar Dudhale

Solapur Political News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकारिणीचा विस्तार केला असून, सोलापुरातील दोन नेत्यांना उपनेते करण्यात आले आहे. त्यात युवा नेते शरद कोळी आणि महिला संघटक अस्मिता गायकवाड या दोघांचा समावेश आहे.

भल्याभल्यांना अंगावर घेणारे आणि खेडेगावातून आलेला शेतकऱ्याचा मुलगा अशी ओळख असलेल्या कोळींना ठाकरेंनी थेट उपनेते करून मातब्बरांच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. (Sharad Koli of Solapur elected as deputy leader of Shiv Sena)

शिवसेनेची संघटन शक्ती वाढावी, तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षवाढीस बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकारिणाचा विस्तार केला आहे. त्यात सहा नवे नेते आणि दहा उपनेते निवडले आहेत.

मातोश्रीवर रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या नव्या नेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अख्ख्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याला झुकते माप मिळाले असून, उपनेते म्हणून जिल्ह्यातील दोघांना संधी मिळाली आहे.

शरद कोळी हे मोहोळ तालुक्यातील अर्धनारी या छोट्याशा खेड्यातून पुढे आलेले नेतृत्व आहे. धाडस सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली. ही संघटना राज्यभरात काम करत असून, तरुणांचे मोठे संघटन त्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात (९ ऑगस्ट २०२२) त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याअगोदरही २०१२ मध्येही शिवसेनेत होते.

दरम्यान, गेल्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद कोळी यांच्याकडे युवा सेनेचे राज्य विस्तारक या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या माध्यमातून त्यांनी युवा सेना मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर कोळी यांनी फुटीर आमदारांना अंगावर घेतले होते.

ठाकरेंवर टीका करण्यास जशास तसे उत्तर देण्याचे काम कोळी यांनी आतापर्यंत केलेले आहे. अगदी राणेंपासून आमदार संजय बांगर यांच्यापर्यंत सर्वांना त्यांच्याच भाषेत सुनावण्यास कोळी यांनी मागे पाहिले नाही. त्यामुळेच कोळी यांची उपनेतेपदी वर्णी लागली आहे.

सोलापूर जिल्ह्यातून अस्मिता गायकवाड यांनाही उपनेतेपदाची लॉटरी लागली आहे. वास्तविक त्या गेली अनेक वर्षांपासून शिवसेनेचे काम पाहत आहेत. गायकवाड या शिवसेना महिला आघाडीच्या संघटक होत्या. आता त्यांच्या खांद्यावर राज्यभराची जबाबदारी देताना उपनेतेपदही त्यांना बहाल करण्यात आलेले आहे.

विधान परिषदेच्या उपसभाती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना सोडल्यानंतर गायकवाड याही शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली असतानाही त्यांनी संयम न ढळू देता ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे फळ त्यांना मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT