Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar: नो 'वेट अँड वॉच'! पक्षप्रवेशाच्या सभेतच पवारांनी घाटगेंना दिला 'हा' मोठा शब्द

Deepak Kulkarni

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना राजकीय गुरू मानणाऱ्या समरजितसिंह घाटगे यांनी कमळाची साथ सोडत थेट मंगळवारी (ता.3) तुतारी हाती घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवेळी अजित पवारांसोबत गेलेल्या व मंत्री हसन मुश्रीफांविरोधातला मोहरा समरजितसिंह घाटगेंच्या रुपाने शोधला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवारांनी घाटगे समर्थकांना मोठा शब्द दिला.

कागलमधील गैबी चौकात समरजितसिंह घाटगे (SamarjeetSinh Ghatge) यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश झाला.यावेळी झालेल्या जाहीर सभेत खासदार शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, जबरदस्त संख्येनं तुम्ही समरजित घाटगे यांच्यासाठी उपस्थित राहिलात. गैबी चौकात मी अनेकदा सभा घेतल्या,पण आजची गर्दी मी कधी पाहिली नाही. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेली साथ विसरून चालणार नाही असंही पवारांनी सांगितले.

पवार म्हणाले, मागे एकदा पक्ष फुटला. त्यावेळी सदाशिवराव आणि बाबासाहेब यांनी पाच वर्षांत पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूरची भूमी स्वाभिमान गहाण ठेवत नाही, हे या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं होतं. दोन दिवसांपूर्वी परदेशातून गहू आणण्याचा निर्णय घेतला,या देशात काय चाललं आहे. एकेकाळी आपल्या देशातील शेतकरी 18 देशात गहू पुरवत होता.

मी समरजित यांना विचारलं होतं की, तुम्ही इतक्या चांगल्याप्रमाणे कारखाना चालवता, बक्षीस मिळवता, ही बक्षीसं ठेवायला जागा आहे का? तरुणांची कष्ट करण्याची तयारी आहे, पण त्यांना उद्धवस्त करण्याचं काम मोदी सरकार करत आहे.राज्यात दररोज दोन चार बातम्या या महिला अत्याचाराच्या असतात अशा शब्दांत शरद पवारांनी सरकारवर टीकेची तोफ डागली.

बदलापूरमध्ये घटना घडली. ज्यांनी त्यांच्यावर कारवाई करायची सोडून आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्याचं काम केलं. मालवण इथं शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. पण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की, वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. गेट वे ऑफ इंडियावर 60 वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा केला, पण त्याला काही झालं नाही.

याठिकाणी 8 महिन्यांत पुतळा कोसळला याचा अर्थ कामात भ्रष्टाचार झाला. आता या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही. तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा. ते फक्त आमदारच राहणार नाहीत, तर त्यांना मंत्री करू असा शब्दही शरद पवारांनी घाटगे समर्थकांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT