Laxman Hake-Sharad Pawar
Laxman Hake-Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Loksabha : माढ्याच्या उमेदवारीचा शब्द शरद पवारांनी ऐनवेळी फिरवला; लक्ष्मण हाकेंचा आरोप

भारत नागणे

Solapur, 21 April : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वर्षभरापूर्वी मला माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार मी कामालाही लागलो होतो. मात्र, मी धनगर समाजाचा असल्यानेच पवारांनी माझी माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची उमेदवारी कापली, असा आरोप ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार लक्ष्मण हाके यांनी केला.

प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आज पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी दिलेल्या शब्दानुसार मी माढा लोकसभा मतदारसंघात कामाला लागलो होतो. अनेक दौरे आणि बैठकाही मी मतदारसंघात घेतल्या होत्या. मी घेतलेल्या बैठका आणि दौऱ्यांमुळे महाविकास आघाडीला माढ्यात चांगले वातावरण तयार झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा भाजपमधून आलेल्या आणि ३१ गुन्हे दाखल असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माझे आडनाव हाके असल्यामुळेच माझी उमेदवारी कापण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेला एक कार्यकर्ता आहे. राज्यभर ओबीसी आणि व्हीजेएनटी समाजासाठी काम करीत आलो आहे. त्या सामाजिक कामाच्या जोरावरच मी महाविकास आघाडीकडे माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली होती. पवारांनी तसा मला शब्दही दिला होता. मात्र, पवारांनी माझा विचार न करता ऐनवेळी भाजपमधून आलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्याची मोठी किंमत महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोजावी लागेल, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला.

मला उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे धनगर आणि ओबीसी समाज महाविकास आघाडीवर नाराज झाला आहे. मतपेटीतून ही नाराजी दिसून येईल. माझ्यावर कोणत्याही नेत्याच्या माध्यमातून दबाव आणला तरी मी माघार घेणार नाही. गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे आणि मतदारांनीच माझी निवडणूक हाती घेतली आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा दावाही हाके यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT