sharad pawar-vitthal sugar factory
sharad pawar-vitthal sugar factory sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सभासद ज्यांच्या हाती ‘विठ्ठल’ देतील, त्यांनाच मदत करणार : पवारांनी केली भूमिका स्पष्ट!

भारत नागणे

पंढरपूर : (कै.) औदुंबर पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना (Vitthal Sugar Factory) व्यवस्थित चालवला होता. त्यांच्यानंतर मात्र कारखाना नीट चालवला गेला नाही. त्यामुळेच हे दिवस आले आहेत, अशी खंत व्यक्त करत निवडणुकीमध्ये सभासद ज्यांच्या हाती कारखाना देतील, त्यांना आम्ही मदत करणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवारांचा आशीर्वाद कोणाला यांचीच चर्चा आता पंढरपूर तालुक्यात सुरु झाली आहे. (Sharad Pawar clarifies role regarding Vitthal Sugar Factory)

विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील, अॅड. दीपक पवार, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. भेटीदरम्यान झालेल्या संवादाची व्हीडीओ क्लिप सध्या सोशल माध्यमात व्हायरल झाली आहे. त्यामध्ये कारखान्याच्या सध्याच्या परिस्थितीविषयी पवार यांनी नाराजी व्यक्त करत भालके यांच्यानंतर कारखान्याची अवस्था वाईट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विठ्ठल साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निवडणूक प्राधिकरणाला निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.येत्या काही दिवसांत कारखान्याची निवडणूक जाहीर होईल, असा अंदाज आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पंढरपूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

मध्यंतरी धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेवून विठ्ठल सहाकरी साखर कारखान्याविषयी चर्चा केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन भालके-काळे यांना वगळून आम्ही निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर पवार यांनाही निवडणूक लढण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान त्यांच्या भेटीमध्ये झालेल्या चर्चेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पवार यांनी असे म्हटले आहे की, (कै.) औदुंबर पाटील यांच्या काळात कारखान्याची परिस्थिती चांगली होती. भालके यांच्यानंतर विठ्ठल कारखान्याची अवस्था फारच वाईट झाली आहे. कारखान्याचे सगळे लोक आपले आहेत. ऊस असूनही कारखाना नीट चालवला गेला नसल्याने हे दिवस आले आहेत. निवडणुकीत लोक हवे त्यांना निवडून देतील. जे निवडून येतील, त्यांना आम्ही मदत करू असेही पवार यांनी म्हटले आहे. यावर काळे-भालके काय प्रतिक्रिया व्यक्त करतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT