Sharad Pawar, Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवार- फडणवीस अन् जरांगे पाटीलही एकाच दिवशी कोल्हापुरात...; राजकीय फटाके फुटणार ?

Sharad Pawar- Devendra Fadnavis - Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अलिकडच्या काळात दिल्ली दौरे वाढले आहे. भाजप नेते...

Deepak Kulkarni

Kolhapur News : राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. राजकीय नेत्यांची दिवाळीही जोरदारपणे सुरू आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या दिवाळी पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गैरहजेरी लावली यावरुन चर्चेला तोंड फुटले असतानाच ते मंगळवारी रात्री सहकुटुंब गोविंदबागेत दाखल झाले.तसेच त्यांनी स्नेहभोजनाचा आनंदही लुटला.पण आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.

आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा महत्वाचा रोल होता हे लपून राहिलेले नाही. अशातच फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 17 नोव्हेंबरला कोल्हापुरात एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहे. आणि विशेष म्हणजे त्याचदिवशी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील देखील कोल्हापुरात असणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतरही राजकीय फटाके कोल्हापुरात फुटण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात 17 नोव्हेंबर रोजी एकाच व्यासपीठावर असणार आहेत.संजय घोडावत विद्यापीठाच्या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणासाठी रान उठवणारे मनोज जरांगे पाटीलही(Manoj Jarange Patil) त्याचदिवशी कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. यामुळे दिवाळीनंतर कोल्हापुरात राजकीय आताषबाजी होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

कोल्हापूर येथील संजय घोडावत विद्यापीठात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे वार्षिक अधिवेशन येत्या 17 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले असून या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे. मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला असतानाच महाराष्ट्रातील हे दोन्ही मातब्बर नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

महायुतीत खटके, विकासनिधीवरुन अजित पवार गट नाराज?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अलिकडच्या काळात दिल्ली दौरे वाढले आहे. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. या दोघांमध्ये महाराष्ट्रातील विविध राजकीय घडामोडींचा चर्चा होत असते.मात्र शाह यांची नवी दिल्लीत जाऊन भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांची येत्या २१ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.ती बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाचा शिंदे गटावर आक्षेप आहे. निधीवाटपात आम्हाला डावलले जात आहे, असे राष्ट्रवादीच्या आमदारांचे म्हणणे आहे.विकास निधीसह विविध विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे आपली भूमिका मांडणार आहेत. महायुतीमध्ये येताना आम्हाला देण्यात आलेल्या शब्दाप्रमाणे निधी मिळत नाही, असे राष्ट्रवादीच्या आमदारांचे दुखणे आहे. तसेच, विकासनिधीत एकसमानता नाही, असेही अजित पवार गटाचे म्हणणे आहे.

महायुतीतील नाराजीवरुन महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेतेमंडळींनी अजित पवारांवर टीकेची संधी साधली.अजित पवार यांच्याकडेच अर्थखाते असतानाच विकासनिधीत डावलले जाण्याचे काही कारण नसल्याचे या नेतेमंडळींचं म्हणणं आहे.याचवेळी हे दोन्ही नेते एकत्र येत असल्यामुळे कोल्हापूरकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT