Harshvardhan Patil, Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : हर्षवर्धन पाटलांशी चर्चा; शरद पवारांच्या डोक्यात काय सुरू ?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांच्या गटातील आमदारांना चेकमेट करण्याची तयारी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सुरू केलेली आहे. बारामतीसह राज्यातील आगामी सर्व निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे सांगत पवारांनी बारामतीकरांना साथ देण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, अजित पवारांच्या विरोधकांना पवार हाताशी घेण्याची रणनीती आखत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यातच माजी मंत्री, इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांशी पवारांनी संवाद साधल्याने राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.

सोलापूरात मंगळवेढ्यातील धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव, धनश्री मल्टीस्टेटच्या तपपूर्ती आणि संस्थापक शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार-पाटील एकत्र आले होते. त्यावेळी हर्षवर्धन पाटील आपल्या जागेवरून उठून शरद पवारांजवळ जाऊन चर्चा करू लागले. हे पाहताच उपस्थितांत अजित पवारांविरोधी लोकांना एकत्रित करण्याचा पवारांचा हा डाव असू शकतो का, अशी चर्चा कार्यक्रमात रंगली.

अजित पवारांनी इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंना बळ देत (Harshvardhan Patil) हर्षवर्धन पाटलांविरोधात दोन टर्म निवडून आणले आहे. आता पाटील आणि पवार दोघेही महायुतीतील घटक पक्षांचे नेते आहेत. दरम्यान, ज्याचा खासदार, आमदार त्याची जागा, या नियमानुसार महायुतीत जागा वाटपाचे प्राथमिक सूत्र ठरले आहे. परिणामी हर्षवर्धन पाटलांना भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळण्याबाबत शंका आहे. ही बाब हेरून शरद पवार फुटीरांविरोधात फिल्डिंग लावण्यासाठी पाटलांना गळ घालतील का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुनेत्रा पवार आणि भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरेंच्या नावाची चर्चा आहे. पाटील काँग्रेसमध्ये असताना आघाडी धर्म म्हणून त्यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना सहकार्य केले आहे. आता ते भाजपवाशी झाले आहेत. तसेच अजित पवार दूर गेल्याने सुळेंना यंदाची लोकसभा सोपी असणार नाही, अशी चर्चा आहे. यातच पाटील आणि पवारांमध्ये झालेल्या संवादात बारामती लोकसभेसाठी काय गणित ठरते का, याचीही चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या गटाला आसमान दाखवणार असल्याचा निर्धार बारामतीकरांपुढे व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अंतुलेंच्या कार्यकाळात झालेल्या बंडाची आठवण करून दिली.

'अंतुले मुख्यमंत्री होते, तेव्हा ७० पैकी ६२ आमदार मला सोडून गेले होते. पुढच्या निवडणुकीत त्यातील ५८ आमदारांना लोकांनी पाडले. त्यांच्या जागी अत्यंत सामन्य कार्यकर्ते आमदार झाले. आताही तीच स्थिती आगामी निवडणुकांमध्ये पाहावयास मिळेल,' असा विश्वास व्यक्त करत पवाारांनी अजित पवारांना इशारा दिलेला आहे. यातूनच आता पाटील आणि पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल, याची प्रचिती येणाऱ्या काळातच येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT