Sudhir Kharatmal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha Election : शरद पवारांनी मला सोलापूर लोकसभेची तयारी करायला सांगितले आहे; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट

विश्वभूषण लिमये

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला लोकसभेसाठी तयारी करायला सांगितले आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांनी केला आहे. खरटमल यांच्या दाव्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी लोकसभा निवडणूक एकत्र लढणार की एकमेकांसमोर उभे ठाकणार, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे. (Sharad Pawar has told me to prepare for Solapur Lok Sabha; NCP leader's secret blast)

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची एकमुखी मागणी पक्ष निरीक्षकांसमोर करण्यात आली होती. त्यातच आता सुधीर खरटमल यांनी ‘आपल्याला शरद पवार यांचा संदेश असून त्यांनी मला लोकसभेची तयारी करायला सांगितले आहे, असा दावा केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वाला टक्कर देण्यासाठी देशपातळीवर इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचपद्धतीने महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तीन पक्षांनी एकत्रित निवडणुका लढविण्याचे ठरविले आहे. त्यातच सोलापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे आमने सामने येण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर लोकसभेच्या जागेवर काय तोडगा काढतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. मुळात महाविकास आघाडीत कोणाला कोणता मतदारसंघ सुटणार याची उत्सुकता नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनाही आहे.

दुसरीकडे सोलापूरमधील माढा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. माढ्याचा पुढचा खासदार काँग्रेसचा असेल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सांगत आहेत. त्यामुळे सोलापूरबरोबर माढ्याचा ही तिढा हे दोन्ही पक्ष कसे सोडवतात, हे पहावे लागेल. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात माढा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे याच मतदारसंघातून २००९ मध्ये निवडून आले होते. पुढे २०१४ च्या मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते-पाटलांनी माढ्याची राष्ट्रवादीची जागा राखली होती. मात्र २०१९ मध्ये मोहिते-पाटील घराणं भाजपवासी झाल्यामुळे राष्ट्रवादीने ही हक्काची जागा गमावली आणि भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे खासदार झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT