Shirala Election Politics sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Election : शिराळ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी; काका-पुतण्यात होणार 'टफ फाईट'

Shirala Nagar Panchyat Election 2025 : गेल्या निवडणुकीत भाजपमधून विजयी ठरलेले अभिजित नाईक यांनी बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपला रामराम ठोकत पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाल्याने चुलत काका-पुतण्यामध्ये अशी प्रतिष्ठेची टक्कर पाहायला मिळणार आहे.

Rahul Gadkar

Sangli News: सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायतीची लढत दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजपसेना यांच्यात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. तर महत्वाचे म्हणजे नगराध्यक्षपदाची निवडणूक चुलते-पुतण्यामध्ये होणार असल्याने त्याला अधिक रंगत आली आहे. शिवाय लढत नाईक घराण्याच्या प्रतिष्ठेची मानली जात असून चुलत काका-पुतणे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निवडणुकीचे समीकरण अधिक रंगतदार झाले आहे.

माजी आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) विरुद्ध आमदार सत्यजित देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या गटात लढत होणार आहे. शिवाय आतापर्यंत मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रचाराला आल्याने ही लढत तितकीच कडवी बनली आहे.

महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) पृथ्वीसिंग नाईक (पुतण्या) यांची राजकीय पहिलीच इंट्री असल्याने उमेदवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून (शरद पवार गट) ग्रामपंचायत ते नगरपंचायत कायम विजयश्री खेचणारे अनुभवी उमेदवार म्हणून अभिजित नाईक (काका) हे रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे अनुभवी विरुद्ध नवखा चेहरा अशी थेट टक्कर शिराळ्यात पाहायला मिळणार आहे. नाईक घराण्याची प्रतिष्ठा, राजकीय गतवैमनस्य आणि बदलती राजकीय नीती यांमध्ये रंगणारी ही निवडणूक शिराळ्यातील सर्वांत लक्षवेधी ठरणार आहे.

या काका-पुतण्याला वंचित बहुजन, प्रहार जनशक्तीसह इतर चार अपक्ष अशा एकूण सहा उमेदवारांनी घेरले आहे. शिराळ्याच्या राजकारणावर नाईक घराण्याची अनेक वर्षे पकड राहिली आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशा अनेक पदांवर या घराण्याची छाप पाहायला मिळाली.

दहा वर्षांपूर्वी मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त करत उदयसिंगराव नाईक, रणजितसिंग नाईक, अभिजित नाईक, विक्रमसिंग नाईक आणि वैशाली नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य शिवाजीराव नाईक गटात दाखल झाले. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली.

त्यावेळी प्रभाग 2 मध्ये आताचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक यांचे मोठे बंधू विश्वप्रतापसिंग नाईक आणि भाजपचे (BJP) तत्कालीन उमेदवार अभिजित नाईक यांच्यादरम्यान थरारक लढत झाली आणि त्यात अभिजित नाईक विजयी झाले. पराभवानंतर विश्वप्रतापसिंग नाईक यांना राष्ट्रवादीचे नेते मानसिंगराव नाईक यांनी स्वीकृत नगरसेवकपद देत मान दिला. आता चित्र पालटले आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपमधून विजयी ठरलेले अभिजित नाईक यांनी बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपला रामराम ठोकत पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाल्याने चुलत काका-पुतण्यामध्ये अशी प्रतिष्ठेची टक्कर पाहायला मिळणार आहे.

गतवेळी मोठ्या मुलाचा झालेला पराभव हा यावेळी लहान मुलगा पृथ्वीसिंग यांच्या गुलालाच्या माध्यमातून पुसण्यासाठी भगतसिंग नाईक यांनी खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक या महायुतीच्या सहकाऱ्यांसह कंबर कसली आहे. दुसरीकडे, कायम अबाधित असणारी 'एकहाती सत्ता' पुन्हा मिळवण्याच्या उद्देशाने मानसिंगराव नाईक यांनी स्वतः एक पाऊल मागे घेत अभिजित नाईक यांच्या पाठीशी शिवाजीराव नाईक यांच्या सहकार्याने आघाडीचा मजबूत आधार उभा केला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT