

Mumbai News: महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला येत्या 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. शुक्ला यांच्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती केली जाणार याबाबत जोरदार चर्चा झडू लागल्या आहेत. याचदरम्यान, राज्य सरकारकडून पोलीस महासंचालकपदासाठी 7 जणांची यादी मंजुरीसाठी यूपीएससीकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
राज्य सरकारकडून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या 7 जणांच्या यादीत 'एनआयए' चे प्रमुख सदानंद दातेसह अनेक वरिष्ठ आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या यादीतून रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यानंतर महाराष्ट्राचे पुढील पोलीस महासंचालक कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्याच्या गृह विभागाकडून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या यादीत राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दाते यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजीव कुमार सिंगल, पोलिस महासंचालक (विधी व तांत्रिक) संजय वर्मा, पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण) अर्चना त्यागी, नागरी संरक्षण दलाचे संचालक संजीव कुमार, गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार, पोलिस महासंचालक (रेल्वे पोलिस) प्रशांत बुरडे या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) पाठवण्यात आलेल्या यादीतून अंतिम विचारासाठी तीन नावे निवडली जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून अंतिम तीन नावांपैकी एकाची पुढील डीजीपी म्हणून नियुक्ती करणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांकडून सातत्याने पक्षपातीपणाचे आरोप झालेल्या रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 चे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर आणि आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर करण्यात आली होती. रश्मी शुक्ला यांना 4 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावरून निवडणूक आयोगाने हटवलं होतं. राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती.
रश्मी शुक्ला या महाराष्ट्र कॅडरच्या वरिष्ठ IPS अधिकारी असून 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. रश्मी शुक्ला फेब्रुवारी 2021 केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
मात्र, राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. सप्टेंबर 2020 मध्ये शुक्ला यांना सरकारने पोलीस महासंचालकपदी (DG) प्रमोशन दिलं. त्यांची बदली सिव्हिल डिफेन्सच्या प्रमुख म्हणून करण्यात आली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख,काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.