Sharad Pawar Sarakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar: 'तुम्ही काही काळजी करू नका, 84 हो किंवा 90, हे म्हातारं काही..'; शरद पवारांचा महायुतीला इशारा

Mayur Ratnaparkhe

Sharad Pawar in Phaltan : फलटणचे आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज(सोमवार) 'तुतारी' हाती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश झाला. याप्रसंगी शरद पवारांनी भाषण करताना तुफान फटकेबाजी केली. तर शरद पवारांच्या वयावरून विविध टिप्पण्या करणाऱ्यांनाही आज शरद पवारांनी चांगलाच टोला लगावला.

शरद पवार(Sharad Pawar) भाषणात म्हणाले, 'आता या ठिकाणी काही तरूण मुलं माझा बोर्ड घेवून उभे होते. त्यावर माझा फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करू नका. अजून लांब बघायचं आहे, 84 हो, 90 हो.. हे म्हातारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तुम्ही त्याची काही काळजी करू नका.'

'या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांची मदत मनापासून होईल, याबाबतची खात्री मी बाळगतो. त्याची सुरुवात आज राष्ट्रवादीत नेत्यांनी प्रवेश केला आणि आपली दिशा काय हे संबंध महाराष्ट्राला कळवलं. त्याबद्दल त्यांचे आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. ही तुतारी संबंध देशात आपल्या सर्वांचा आवाज पोहचवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो.' असं शरद पवारांनी बोलून दाखवलं.

तत्पुर्वी भाषणात सत्ताधारी महायुती सरकारवर टीका करताना शरद पवारांनी म्हटले की, 'आज केवळ फलटणपुरताच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. आज या महाराष्ट्राची सत्ता चुकीच्या लोकांच्या हाती आहे. एका बाजूला बहिणीची योजना काढली जाते. मात्र, तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचा रोज मुलींवर कुठं ना कुठं या राज्यात अत्याचार होत आहेत, या बातम्या वाचायला मिळत आहेत. बहिणींची, मुलींची प्रतिष्ठा ठेवत नाहीत. ठाणे जिल्ह्यात एका शाळेत लहान मुलींवर अत्याचार झाले आणि हे अत्याचार करणारे जे कोणी घटक होते, त्यांच्यावर कारवाई करायला अनेक दिवस लागले. याचा अर्थ स्पष्ट आहे. माता-भगिनींवर अत्याचार होत असताना, त्यांच्या संरक्षणासाठी आजचे राज्यकर्ते कमी पडत आहेत.'

तसेच, 'माजी मंत्र्याला घरासमोर गोळ्या घालून ठार केलं जातं, हे कसलं राज्य आहे? सामान्य माणासांना माता-भगिनींना सन्माने जगता येत नाही. हे जर चित्र या ठिकाणी असेल तर हे राज्य पुढे जाऊ शकणार नाही. हे राज्य सध्या भ्रष्टाचाराने ज्यांचे हात बरबटलेले आहेत, अशा लोकांच्या हातात आहे. त्याचा परिणाम आज प्रशासनावर ठिकठिकाणी होतोय.' असंही बोलून शरद पवारांनी म्हटलं.

याशिवाय, 'सिंधुदुर्गचा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक आदर्श किल्ला आहे. शिवछत्रपतींनी उभा केलाय. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा, ज्याचं पंतप्रधानांनी स्वत: उद्घाटन केलं आणि आठ महिन्यांच्या आत पुतळा कोसळतो. विचारलं, चौकशी झाली? तर काय सांगितलं गेलं, की वारा जास्त आला म्हणून पुतळा पडला. याचं कारण पुतळ्यातही भ्रष्टाचार झाला. तो भ्रष्टाचार सगळ्या ठिकाणी करणं ही आजच्या राज्यकर्त्यांची नीती आहे. म्हणून त्यांच्या हातातून सत्ता काढून घेणं हेच काम तुम्हाला आणि मला करायचं आहे आणि त्यासाठी आज एकत्र होण्याची गरज आहे. तेच काम संबंध महाराष्ट्रात फिरून आम्ही लोक करत आहोत.' असंही शरद पवार म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT