Sharad Pawar, Tutari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha Election : शरद पवारांचा साताऱ्यातील उमेदवार ठरला?; निष्ठावंत शिलेदारावर शिक्कामोर्तब करणार!

Umesh Bambare-Patil

NCP Sharad Pawar News : सातारा लोकसभेच्या रणसंग्रामात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते व खासदार शरद पवार कोणाचे नाव अंतिम करणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. पवारांचे निष्ठावंत शिलेदार आमदार शशिकांत शिंदे यांच्यावरच ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं समोर येत आहे. त्यांनी होकार कळविला नसला तरी याबाबतच्या घोषणेची केवळ औपचारिकता असल्याचे राष्ट्रवादीतील संपर्क सूत्रांकडून सांगितले जात आहे.

सातारा लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच उमेदवार ठरण्याआधी प्रचार सुरू झाला आहे. एकीकडे महायुतीत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी त्यांना वरिष्ठ नेत्यांनी कामाला लागा असा सल्ला दिल्याचे सांगत कमळ चिन्हावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, त्यांच्याबाबतची अधिकृत घोषणा भाजपकडून होणे बाकी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर उदयनराजे यांच्याविरोधात खासदार शरद पवार(Sharad Pawar) कोणाला उभे करणार याची उत्सुकता ताणली आहे. या परिस्थितीत साताऱ्यात झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी चार उमेदवारांची नावे अंतिम केली होती. त्यापैकी एकाचे नाव निश्चित होणार होते.

या चार जणांच्या यादीत आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने यांच्या नावांचा समावेश होता. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्या साताऱ्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते जो उमेदवार देतील, त्याला मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार सर्व पक्ष व संघटना यांनी केला होता.

त्यामुळे शरद पवार यांनी सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी कराडला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तुतारीच्या चिन्हावर लढावे, अशी सूचना केल्याची माहिती समोर आली होती.

परंतु त्यांनी नकार दिला आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, यातून आपला राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी अखेर आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या नावाचा विचार खासदार शरद पवार यांनी केला आहे, असं सांगितलं जात आहे.

एकीकडे महायुतीतून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचे आव्हान पेलून दुसरीकडे पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचे आव्हान उमेदवारी जाहीर झाली तर शशिकांत शिंदे यांच्यावर असणार आहे. तसेच पक्ष आणि शरद पवार यांचे निष्ठावंत अशी त्यांची ख्याती आहे.

त्यामुळे असा निष्ठावंत शिलेदार असणाऱ्या शशिकांत शिंदे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बुधवारी किंवा गुरुवारी याबाबतची अधिकृत घोषणा शरद पवार यांच्या पक्षाकडून होणार असल्याचे राष्ट्रवादीतील संपर्क सूत्रांनी सांगितले आहे.

कोण आहेत शशिकांत शिंदे? -

शशिकांत शिंदे हे माथाडी नेते असून, त्यांनी सर्वप्रथम जावळीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची निवडणूक लढली आणि ते आमदार झाले होते. त्यानंतर शरद पवार यांच्या सांगण्यावरून कोरेगावमधून निवडणूक लढून आमदार शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता.

तसेच त्यांनी सातारा जिल्ह्यात जनता दरबारची संकल्पना राबवून येथील जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. मेडिकल कॉलेजला ते जलसंपदामंत्री असताना त्यांनी कृष्णा खोऱ्याची जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता.

तसेच विविध सिंचन योजनाना निधी मंजूर करण्याचे काम त्यांनी केले आहे. सध्या ते राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आहेत. याचबरोबर पक्षाचे लोकसभा निवडणुकासाठीचे स्टार प्रचारक आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT