mahadevrao mahadik
mahadevrao mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोरे, आवाडे गटाचे मतदार विरोधकांच्या हाती लागू नयेत यासाठी महाडिकांनी आखली विशेष रणनीती !

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीत एक एक मतासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. एकीकडे पालकमंत्री सतेज पाटील ह्यांनी काही दिवसांपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानंतर भाजपचा उमेदवार महाडिक कुटुंबातीलच असणार, हे जवळपास स्पष्ट झाल्याने रविवारपासून (ता. १४ नोव्हेंबर) प्रचार यंत्रणा सक्रिय करण्याचा निर्णय आज झालेल्या महाडिक गटाच्या बैठकीत झाला. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीला माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील व महाडिक गटाचे शंभरहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, बैठकीनंतर रात्री माजी खासदार महाडिक, प्रा. पाटील यांनी पन्हाळा येथे भेट देऊन तेथील जनसुराज्यच्या नगरसेवकांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. (Shaumika and Amal Mahadik will be responsible for kolhapur ZP members)

निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी निश्‍चित आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली असून त्यांची यंत्रणाही जिल्ह्यात कामाला लागली आहे. भाजपाचा उमेदवार ठरलेला नाही. दोन दिवसांपूर्वी उमेदवारीवर चर्चा झाली. त्यानंतर काल (ता. १२) भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. या भेटीत श्री. महाडिक यांच्या स्नूषा व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्याऐवजी स्वतः अमल यांनी रिंगणात उतरावे अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काहीही झाले तरी भाजपकडून महाडिक कुटुंबातील उमेदवार निश्‍चित आहे. या पार्श्‍वभूमीवर आज प्रचार यंत्रणेबाबात माजी खासदार महाडिक यांच्या कार्यालयात बैठक झाली.

निवडणुकीसाठी मंगळवारपासून (ता. १६) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे उद्या रात्री किंवा सोमवारी भाजपचा उमेदवारीची घोषणा मुंबईतून होईल. त्यामुळे प्रचार व संपर्क यंत्रणा कशी राबवायची यावर बैठकीत चर्चा झाली. महाडिक कुटुंबातील काही सदस्यांसह प्रा. पाटील यांच्यासारख्यांकडे काही नगरपालिका व नगरसेवकांची जबाबदारी सोपवली. जिल्हा परिषद सदस्यांच्या भेटीची जबाबदारी स्वतः अमल व शौमिका यांच्याकडे आहे. विशेषतः आमदार प्रकाश आवाडे व विनय कोरे यांना मानणारे मतदार विरोधकांच्या हाताला लागणार नाहीत, यासाठी विशेष यंत्रणा राबवण्याचेही ठरले.

महाडिकांची कारखान्यावरून यंत्रणा

मतदार संघाचे माजी आमदार महादेवराव महाडिक आज दिवसभर कसबा बावडा येथील राजाराम कारखान्यावर तळ ठोकून होते. तेथूनच त्यांनी काही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांशी संपर्क साधला. काही जिल्हा परिषद सदस्यांनीही त्यांची भेट घेतली. कारखान्यांवर बसूनच महाडिक यांनी यंत्रणा कार्यरत केली.

अमल महाडिक यांनी घेतली महावीर गाट यांची भेट

माजी आमदार अमल महाडिक यांनी येथील भाजपचे ज्येष्ठ नेते उद्योगपती महावीर गाट यांची आज भेट घेऊन निवडणूकविषयक चर्चा केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीही दूरध्वनीवरून संपर्क साधून महावीर गाट यांच्याशी चर्चा केली. हुपरी पालिकेत ज्येष्ठ नेते महावीर गाट यांच्या नेतृत्वाखाली भाजप व ताराराणी आघाडीची सत्ता आहे. त्यांच्या पत्नी जयश्री गाट या नगराध्यक्षपदी भाजपतर्फे निवडून आल्या आहेत. पालिकेत भाजपचे संख्याबळ ८ आहे. त्यामध्ये एका स्वीकृत नगरसेवकाचा समावेश असून, एकूण नगराध्यक्षांसह ९ मतदार भाजपचे आहेत. सत्तेमधील सहभागी घटक ताराराणी आघाडीचे एका स्वीकृत नगरसेवकासह सहा नगरसेवक मतदानास पात्र आहेत. हे सर्व जण महावीर गाट यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत.

पालिकेतील भाजप व ताराराणीच्या १५ मतांचे पॅकेज पाहता माजी आमदार अमल महाडिक यांनी आज महावीर गाट यांची कोल्हापूर येथे निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांनी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत पाठबळ लाभल्यास निवडणुकीत ताकदीने उतरण्याची भावना व्यक्त केली. महावीर गाट यांनी पक्षाच्या निर्णयाशी बांधील असल्याचे स्पष्ट करून उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. यावेळी नगराध्यक्षा जयश्री गाट, युवा नेते अमित गाट उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT