shivsena
shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेकडून घोलपांच्या पर्यायाची चाचपणी : दोन राजकीय प्रवेशांची शक्यता

सरकारनामा ब्युरो

Shivsena : शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) हे शिंदे गटाबरोबर गेले आहे. त्यामुळे शिवसेनेला शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार शोधावा लागणार आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री बबनराव घोलप यांची शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तरी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता शिवसेना पर्यायी उमेदवारही तयार ठेऊ पाहत आहे. त्यासाठीची चाचपणी सुरू झाली आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे शिवसेनेला उमेदवार मिळविण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. लोखंडे शिंदे गटात गेल्यावर अहमदनगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असलेल्या भाऊ कोरगावकरांची गच्छंती करण्यात आली. त्यांच्या जागी लोकसभा मतदार संघ निहाय संपर्क प्रमुख देण्यात आले. नगर जिल्ह्याला संपर्क प्रमुख म्हणून आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी उत्तर नगर जिल्ह्यात बबनराव घोलप यांच्या समवेत मागील आठवड्यात प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न झाला.

चार दिवसांपूर्वी सुनील शिंदे हे शेवगाव-पाथर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी अचानक वाट वाकडी करत अहमदनगर शहरात प्रवेश केला. शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आरपीआय )च्या एका नेत्याशी त्यांनी बैठक घेतली. यात अनेक शक्यतांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. हा आरपीआय नेता वेळ प्रसंगी शिवसेनेत प्रवेश करेल का या वरही चर्चा झाली. शिवाय आरपीआय नेते रामदास आठवले यांनाही शिर्डीतून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. मागील सहा महिन्यांत त्यांनी चार दौरे जिल्ह्याच्या उत्तर भागात केले आहेत. त्यामुळे शिवसेनेने बबनराव घोलप यांचे नाव शिर्डीत पुढे केले असले तरी ऐन वेळी काहीही होऊ शकते अशी चर्चा आहे. मात्र या संदर्भात दोन्ही पक्षांकडून काहीही सांगण्यास नकार दिला.

निवृत्त अधिकारी संपर्कात

एक निवृत्त शासकीय अधिकारीही शिवसेनेच्या संपर्कात आहे. त्याने अहमदनगरमधील काही शिवसेना नेत्यांशी शिवसेनेत प्रवेश करण्या संदर्भात चर्चाही केली आहे. त्यामुळे यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षात नसलेला मात्र राजकीय वजन असलेला व्यक्त शिवसेनेला ऐता मिळण्याची शक्यता आहे. या नेत्याचा आमदार लहू कानडे यांच्या सारखा दांडगा जनसंपर्क असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शिवसेना घोलपांना पर्याय तयार ठेवत आहे.

2014ला काय झाले होते

2014मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदार संघातून बबनराव घोलप यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र न्यायालयीन अडचणींमुळे त्यांना निवडणूक लढता आली नव्हती. मतदानाला 15 दिवस शिल्लक असताना भाजपतून आलेल्या सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेत फुट पडताच ते शिंदे गटात गेले. शिवसेनेत असतानाही त्यांचे भाजपशी जास्त सौख्य होते असे आरोप शिवसैनिक करत होते. तसा प्रसंग पुन्हा यावू नये यासाठी शिवसेना आपली तयारी करत असल्याची सांगितले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT