Satara,13 September : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक स्वबळावर ताब्यात घेण्याची तयारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे, जिल्हा परिषदेत संख्याबळ जास्त असूनही राष्ट्रवादी व शिवसेनेचे तोंड भाजल्याने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत ताकही फुंकून पिण्याची मानसिकता ठेवली आहे. अशा स्थितीत राजकीय जोडे बाजूला ठेवून सहकारासाठी एकमेकांच्या सहकार्यातून सर्वपक्षीय पॅनेलद्वारे वाटचाल करण्याची चर्चा प्रस्थापितांकडून सुरू झाली आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. आता निवडणूक कार्यक्रमाची उत्सुकता आहे. कार्यक्रम जाहीर होण्यासाठी अजून दहा दिवसांचा कालावधी आहे. या मधल्या दहा दिवसांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांकडून अनेक डावपेच टाकले जाण्याची शक्यता आहे.
भाजपने जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या तुलनेत कमी संख्याबळ असूनही भाजपने सर्व आयुधे वापरून आपलाच अध्यक्ष, उपाध्यक्ष केला. त्याची सल राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहे. आता जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने काही करण्याआधीच सर्व समावेशक पॅनेल करण्याची कल्पनाही पुढे आणली जात आहे.
सहकारात राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र येत जिल्हा बॅंकेचा कारभार चालवावा, देशात नावाजलेल्या बॅंकेच्या वाटचालीला या निवडणुकीच्या निमित्ताने गालबोट लागू नये, याची काळजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून घेतली जाणार आहे. त्यानुसार येत्या दोन-चार दिवसांत बॅंकेच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी सर्वसमावेश बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
फडणवीस कोणते टार्गेट देणार
जिल्हा बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळात भाजपच्या संचालकांची संख्या अधिक आहे; पण ते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपचे चार आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षाने शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन साताऱ्याच्या जनमताचा आदर केला आहे, त्यातून जिल्ह्यात पक्षाची वाढलेली ताकद पाहून जिल्हा बॅंकही भाजपच्या विचारांची होण्यासाठी या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन मंत्री, एक खासदार व दोन आमदारांना कोणते टार्गेट दिले जाणार, याची उत्सुकता आहे.
जिल्हा बॅंकेत सर्वाधिक ठराव राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडे असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या नेत्यांनीही अधिकाधिक ठराव आपल्या विचारांचे करून आपली बाजूही भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजप महायुतीच्या नेत्यांच्या मदतीने पॅनेल उभे करणार की स्वतंत्र लढणार? हे अद्यापतरी गुलदस्त्यात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, तसेच शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांना जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवेळी सर्वाधिक संख्याबळ असूनही शह मिळाला होता. जिल्हा परिषदेत तोंड भाजलेले असल्याने जिल्हा बॅंकेतही भाजपकडून जिल्हा परिषदेप्रमाणे धोबीपछाड मिळू नये, याची काळजी घेत सावध पवित्रा घेतला आहे. त्यासाठीच त्यांनी सर्वसमावेश सर्वपक्षीय पॅनेलचा मुद्दा पुढे करत येत्या दोन-चार दिवसांत एकत्र बसून निर्णय करण्याची भूमिका घेतली आहे.
गेस्ट हाऊसमध्ये खलबतं
या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बॅंकेत ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर, बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, रामभाऊ लेंभे, सुनील खत्री, कांचन साळुंखे यांची आवर्जून उपस्थिती होती. बॅंकेच्या बैठकीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत काही संचालकांची बॅंकेच्या गेस्ट हाऊसमध्ये खलबते झाली. मात्र, संचालक बाळासाहेब पाटील हे बैठक संपताच निघून गेले होते. त्यानंतर खासदार नितीन पाटील, अनिल देसाई यांची रामराजेंसोबत तासभर बैठक झाली.
जयकुमार गोरे की शेखर गोरे?
एकूण घडामोडी पाहता सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे हे कोणती भूमिका घेणार, हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. बॅंकेचे विद्यमान संचालक शेखर गोरे यांनीही जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ते असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोण कोणाला ॲडजेस्ट करणार, याची उत्सुकता आहे.
फलटणमधून दोन निंबाळकर बँकेत येणार?
बॅंकेच्या निवडणुकीबाबत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत येत्या दोन दिवसांत काही प्रमुख संचालकांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत निर्णय ठरेल. फलटणमधून माझ्यासह बंधू संजीवराजे, शिवांजलीराजे यांचेही ठराव झाले आहेत, त्यामुळे आमच्यापैकी कोण दोघे बॅंकेत येणार, हे लवकरच समजेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वतंत्र पॅनेलचा विषय सध्यातरी नाही : नितीन पाटील
बॅंकेत महायुती म्हणून एकत्र लढणार का, या प्रश्नावर बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी आम्ही जिल्हा बॅंकेत राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून कामकाज करतो. यावेळीही सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे कोणाचे स्वतंत्र पॅनेल हा विषय सध्यातरी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.