Laxman Hake
Laxman Hake Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेत नाराजीनाट्य : सभेत बोलू न दिल्याने प्रवक्ते कार्यक्रम सोडून निघून गेले!

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला (Sangola) येथे रविवारी (ता. २५ डिसेंबर) झालेली महाप्रबोधन यात्रा विविध अर्थाने गाजली. या महाप्रबोधन यात्रेतील सभेत सांगोला तालुक्यातील रहिवासी व शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना या सभेत बोलू दिले गेले नाही. तसेच, त्यांचा नामउल्लेखही टाळला गेल्याने ते या सभेतून उठून गेले, त्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. (Shiv Sena spokesperson Laxman Hake left the Mahaprabodhan Yatra meeting in Sangola)

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुरू केलेली महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्रात सर्वत्र गाजत आहे. सांगोल्यातही या महाप्रबोधन यात्रेनिमित्त झालेली सभा सर्वार्थाने गाजली. सभेतील उपनेत्या सुषमा अंधारे यांचे भाषण, त्यांनी सभेतच दाखवलेले व्हिडिओ आणि स्थानिक आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर केलेली टीका याची चर्चा सुरू आहे. पण, ही सभा शिवसेनेच्याच प्रवक्त्यामुळे सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथील रहिवासी असलेले प्रा. लक्ष्मण हाके यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षाची बाजू मांडण्यासाठी पक्षाचे प्रवक्तेपद दिले. रविवारी त्यांच्या तालुक्यातील सांगोला येथे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा होती. शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राज्यपातळीवर शिवसेनेत महत्त्वाची भूमिका मांडणाऱ्या प्रा. लक्ष्मण हाके यांचा साधा नामोलेखही केला नाही. कार्यक्रमाचे संयोजकांनीही त्यांना दुर्लक्षित केले.

शिवसेनेत प्रवक्ते यासारखे महत्त्वाचे पद असूनही दररोज माध्यमातून आणि विविध कार्यक्रमांद्वारे आपल्या भाषणातून शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या प्रा. लक्ष्मण हाके यांनाही सांगोला येथील कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली नाही. यामुळे नाराज झालेले प्रा. हाके चिडून कार्यक्रम सुरू असतानाच व्यासपीठावरून निघून गेले.

सांगोला येथील महाप्रबोधन यात्रेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव, तुषार इंगळे आदींची भाषणे झाली. पण, शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके आणि सांगोला तालुक्यातील एकाही पदाधिकाऱ्याला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोर आपले मनोगत व्यक्त करता न आल्याने तसेच महाप्रबोधन यात्रेसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यातही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या नाराजी नाट्याविषयी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

‘मी दुखावलो आहे; पण....’

मी खूप लहान माणूस आहे; परंतु अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे जी भूमिका मिळाली आहे, ती पार पाडत असतो. माझ्यात काहीतरी योग्यता असेल म्हणूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रवक्तेपद दिले. मी उद्धवसाहेबांचा शिवसैनिक आहे. मला दुर्लक्षित करून माझा अपमान करणाऱ्या वरिष्ठांच्या लेखी मी शून्य असेन; परंतु त्यांनी प्रवक्तेपदाचा तरी सन्मान राखला पाहिजे. या पुढील काळात शिवसेनेची भूमिका मांडताना याचा माझ्यावर जराही परिणाम होणार नाही. माझी भूमिका मी सक्षमपणे पार पाडली होती. यापुढेही निरंतर आणि निष्ठेने माझे काम सुरू ठेवेन. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवून महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मात्र माझ्याच तालुक्यात येऊन माझ्या पदाचा सन्मान न राखल्याने मी दुखावलो आहे, असे शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT