Sanjay Raut-Amar Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shiv Sena : काँग्रेसकडील मतदारसंघातून शिवसेना फुंकणार सोलापुरातून विधानसभेसाठी रणशिंग

Vijaykumar Dudhale

Solapur, 10 September : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा येत्या गुरुवारी (ता. 12 सप्टेंबर) खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गुरुवारी मेळावा होणार आहे. त्या मेळाव्यातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभेसाठी रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप झाले नसले तरी याच मेळाव्यातून दक्षिण सोलापूर मतदारसंघावर शिवसेना दावा करण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचे गुऱ्हाळ अजून सुरू आहे. कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, हे अद्याप निश्चित नाही. तोवरच आघाडीतील पक्षांकडून मतदारसंघनिहाय तयारी सुरू केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचा (shivsena UBT) आमदार नाही. मात्र, आगामी निवडणुकीत ते अपयश पुसून काढण्याची तयारी शिवसेनेने चालवली आहे, त्यातून येत्या गुरुवारी शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सध्या भाजपचे सुभाष देशमुख आमदार आहेत. मागील सलग दोन निवडणुकीत ते निवडून आले आहेत. मात्र, या वेळी त्यांना तगडे आव्हान भेटण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघातून काँग्रेसकडून अनेक जण इच्छूक आहेत. त्यात माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, महादेव कोगनुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नावाची चर्चा आहे.

दिलीप माने यांनी 2009 मध्ये दक्षिण सोलापूरमधून निवडणूक जिंकलेली आहे. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता ते पुन्हा काँग्रेसकडून इच्छूक आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून अमर पाटील हे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. मागील वर्षभरापासून अमर पाटील यांनी फारसा गाजावाजा न करता तयारी चालवली आहे. खासदार संजय राऊत यांनी मागील दौऱ्यात अमर पाटील हेच दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतील, असे सांगितले होते.

खासदार संजय राऊत हेच येत्या गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवसैनिकांच्या मेळाव्यातून ते दक्षिण सोलापूर मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे. याच मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना विधानसभेसाठी रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेच्या दाव्यांमध्ये अडकलेला दक्षिण सोलापूर मतदारसंघ कोणाला सुटणार, याचे कोडे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT