Maharashtra Political News: राजकारणात प्रवेश हा लोकांची सेवा करण्यासाठी असतो का, या मुद्द्यावर मतमतांतरे असून शकतात, मात्र वैयक्तिक महत्वाकांक्षा सर्वोपरि असते, यावर सर्वांचे एकमत होऊ शकते.
महत्त्वाकांक्षा नसलेला माणूस एके ठिकाणी थांबून राहील आणि अर्थातच त्याची प्रगती खुंटून जाईल. राजकारणालाही हे लागू होतेच. महत्त्वाकांक्षा नसलेले किंवा ती असूनही त्याची जाहीर वाच्यता न केलेले अनेक भले नेते राजकीय पटलावरून बाजूला गेल्याची काही उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.
दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत घमासान सुरू झाले आहे. त्यात काही वावगे आहे, असे म्हणता येणार नाही, कारण ते जिवंतपणाचे लक्षण आहे.
आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडे केली होती. मात्र, मुख्यमंत्री कोण हे, निवडणुकीनंतर ठरेल, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आहे. तिकडे, महायुतीतही मुख्यमंत्री कोण असेल, यावरून कलगीतुरा सुरू झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजितदादा पवार 40 आमदारांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. अजितदादांचा महायुतीतील प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षासाठी अडचणीचा ठरला. शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, मात्र अजितदादांच्या 'एन्ट्री'मुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले.
शिंदे गटाच्या वाट्याला जाऊ शकणारी मंत्रिपदे अजितदादांच्या शिलेदारांना मिळाली आणि त्यावेळेसपासून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामती मतदारसंघाबाबत शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून दोन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याचे जाहीर झाले होते.
आता आगामी मुख्यमंत्रिपदावरूनही शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतरच ठरेल, असे आजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून 'बॅटिंग' सुरू केली आहे.
महायुतीची सत्ता आली तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असे विधान शिवतारे यांनी केले आहे. शिवतारे यांच्या मनाला 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य अजूनही बोचत असल्याचे दिसत आहे.
त्या निवडणुकीत अजितदादा पवार यांनी तू निवडून येतोच कसा, हे बघतो, असे आव्हान शिवतारे यांना दिले होते आणि ते खरे करूनही दाखवले होते. त्यामुळेच शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीत अजितदादांना अडचणीत आणण्याची भूमिका घेतली होती.
अजितदादा पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पालकमंत्री पदे मिळवण्यातही त्यांनी बाजी मारली होती. पुण्याचे पालकमंत्रिपद अजितदादांनी स्वतःकडे घेण्यात यश मिळवले होते.
भाजपने चंद्रकांतदादा पाटील यांनी बाजूला करून अजितदादांना पुण्याचे पालकमंत्री केले होते. अन्य काही पालकमंत्रिपदे मिळवताना अजितदादांनी शिंदे गटावर मात केली होती. शिंदे गट आणि अजितदादांच्या पक्षात संघर्ष होणार असल्याचे संकेत त्यावेळीच मिळाले होते.
मुख्यमंत्री बनण्याची अजितदादा यांची महत्त्वाकांक्षी लपून राहिलेली नाही, त्यात गैर असेही काही नाही. मात्र, आघाड्यांच्या राजकारणात अशा महत्त्वाकांक्षेमुळे संघर्ष निर्माण होतो, हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असा आग्रह महाविकास आघाडीकडे धरला होता. त्याला महायुतीतील मित्रपक्षांकडून मान्यता मिळालेली नाही. मुख्यमंत्री कोण हे संख्याबळावर ठरेल, असे शरद पवार यांनी नुकतेच जाहीर केले आहे.
तत्पूर्वी, काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांच्या मागणीशी सहमती दर्शवली नव्हती. यावरून शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावर तिरकस निशाणा साधला होता. आता महायुतीतही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महायुतीत अंतर्गत कलह वाढलेले दिसून येत आहेत.
शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रिपदावरून संघर्ष सुरू झालेला असताना महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भाजप मात्र शांत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना नाईलाजाने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले होते.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आली तर फडणवीस मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडतील, पुन्हा उपमुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार यांच्यासाठी मार्ग मोकळा करतील, असा समज मित्रपक्षांनी करून घेतला असेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.