Tanaji Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara-Sangli : भाजपला पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यातून पहिला दणका : शिवसेनेच्या बड्या नेत्याने भरला विधान परिषदेसाठी अर्ज

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव कायम असताना सांगलीतील शिवसेनेच्या नेत्याने सातारा-सांगली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करून शक्तीप्रदर्शन केले.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 30 May : महायुतीमध्ये विधान परिषदेच्या १७ जागांच्या वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप शिवसेनेला चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन देण्याच्या पुढे सरकत नसल्याने आणि हे दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने महायुतीचे जागा वाटपाचे घोडे अडले आहे. मात्र, सातारा-सांगली मतदारसंघासाठी शिवसेनेकडून सांगलीतील बड्या नेत्याने शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे आता भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मी शिवसेनेकडून सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे, असे तानाजी पाटील यांनी स्पष्ट केले.

महायुतीमध्ये कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), संभाजीनगर, नाशिक या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत वाद आहे, तर पुणे, रायगड, परभणी या तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचा एकच दिवस शिल्लक असताना पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेनेच्या बड्या नेत्याने सातारा-सांगली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.

सातारा सांगली मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीत तो भाजपकडे जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्याचे समर्थनही केले होते. दावा करण्यात काहीही गैर नाही. भाजपने पुणे आणि संभाजीनगर मागितले आहे, तसे आम्हीही कोकण आणि सातारा मागितले आहे. तसेच या मतदारसंघात शिवसेनेचे ११० पेक्षा जास्त मते आहेत, हेही ठणकावून सांगताना महायुतीमधील अंतर्गत वाद घातक ठरू शकतो, असेही म्हटले होते.

सामंतांनी इशारा देऊन चोवीस तास होत नाहीत तोच सातारा-सांगली मतदारसंघातून शिवसेनेचे सांगली जिल्ह्याच्या आटपाडीतील बडे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तानाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत सातारा-सांगली विधान परिषद उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे.

सांगली-सातारसाठी शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपची भूमिका काय असणार,याकडे दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील अंतर्गत तणाव मिटणार की वाढत जाणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT