

Solapur, 30 May : विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षात जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. पक्षाकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य शहाजी पवार यांच्या उमेदवारीचे संकेत त्यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या मोबाईल स्टेट्स वरून मिळत आहेत. त्यामुळे सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून शहाजी पवार यांना उमेदवार जाहीर होणार का?, याची उत्सुकता आहे.
महायुतीमध्ये संख्याबळाचा विचार करता सोलापूर (Solapur) विधान परिषदेची जागा भाजपच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी पक्षात जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. मात्र, उमेदवारी मिळविण्यात कोण यशस्वी ठरणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, राजन पाटील, दिलीप माने, प्रदेश कार्यकरिणी सदस्य शहाजी पवार (Shahaji Pawar ), रोहन देशमुख, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. या सर्वांमध्ये परिचारक यांचे पारडे जड मानले जात आहे.
भाजपच्या धक्कातंत्राच्या निर्णयाचा विचार करता पक्षाकडून ऐनवेळी कोणतही नाव जाहीर होऊ शकते, त्यामुळे सोलापूर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवारीबाबत प्रचंड उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. या सर्वांमध्ये आता शहाजी पवार यांचे नाव त्यांचे बंधू जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यामुळे चर्चेत आले आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी शुक्रवारी दुपारनंतर आपल्या मोबाईलच्या ‘व्हॉटस अप’वर स्टेट्स म्हणून शहाजी पवार यांचा फोटो आणि त्याखाली ‘भावी आमदार’ असा उल्लेख असलेला मजकूर ठेवला आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा परिषदेसारख्या मोठ्या संस्थेचे उपाध्यक्ष असलेले इंद्रजीत पवार यांनीच भावी आमदार म्हणून स्टेट्स ठेवणे याला विशेष महत्व आहे. इतर कार्यकर्त्यांनी असं स्टेट्स ठेवणं ही सर्वसामान्य बाब ठरली असती. मात्र उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने हे स्टेट्स ठेवून उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिल्याचे मानले जात आहे.
उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही : शशिकांत चव्हाण
यासंदर्भात जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले, भाजपच्या उमेदवारीचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. आपल्या नेत्याला उमेदवारी मिळणार, असा दावा प्रत्येक नेत्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. मात्र पक्षाकडून अजून कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.