- राहुल गडकर, कोल्हापूर
Shivaji University, Kolhapur : शिवाजी विद्यापीठातील एका विभागात पीएच.डी. अंतर्गत घेण्यात येणारी मूल्यमापन परीक्षा चक्क व्हॉट्सॲपवर घेतल्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात ‘सरकारनामा’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी ३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळण्याची शक्यता आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, मॅनेजमेंट कौन्सिल आणि ॲकॅडमिक कौन्सिलमधील ३ सदस्यांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रा. डॉ. बी. एस. सातपुते, प्रा. डॉ. रघुनाथ ढमकले आणि प्रा. डॉ. राजेश निमट यांचा समावेश आहे. संबंधित घटनेची सखोल माहिती घेऊन पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याच्या सूचना समितीला देण्यात आल्या आहेत. समितीकडून संबंधित विभागप्रमुखांसोबतच पीएच.डी करणाऱ्या सर्व 13 विद्यार्थ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.
नेमके प्रकरण काय?
शिवाजी विद्यापीठातील एका विभागात पीएच.डी. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेली अंतर्गत मूल्यमापन परीक्षा चक्क व्हॉट्सॲपवर घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात एका विद्यार्थ्याने विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती.
विद्यापीठात पीएच.डी. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरपीई (रिसर्च अँड पब्लिकेशन एथिक्स) हा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, या अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका डाउनलोड करून संशोधक विद्यार्थ्यांना देऊ नये, असा विद्यापीठ प्रशासनाचा नियम आहे. असे असतानाही संबंधित अभ्यासक्रम डाउनलोड करून विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा आरोप आहे.
एवढेच नव्हे, तर विद्यापीठ प्रशासनाची मनाई असतानाही मूल्यमापन परीक्षेचे प्रश्न व्हॉट्सॲपवर पाठवून परीक्षा घेण्यात आल्याचे समोर आले होते. विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची प्रिंट काढून त्यावर उत्तरे लिहावीत, स्वाक्षरी करावी आणि उत्तरपत्रिका ई-मेलद्वारे पाठवावी, अशा पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकारामुळे परीक्षेची गोपनीयता आणि मूल्यमापन प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
तक्रारदार विद्यार्थ्याने दिले महत्त्वाचे पुरावे
या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्याशी विद्यापीठ प्रशासनाने संपर्क साधला होता. संबंधित घटनेबाबत उपलब्ध असलेले पुरावे सादर करण्याच्या सूचना त्याला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तक्रारदार विद्यार्थ्याने संबंधित पुरावे विद्यापीठ प्रशासनाकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे. आता चौकशी समिती या पुराव्यांच्या आधारे प्रकरणाची पडताळणी करणार आहे.
इंडिया आघाडीकडूनही निवेदन
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी इंडिया आघाडीकडूनही विद्यापीठ प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले आहे. संबंधित प्रकरणातील डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवावेत आणि तक्रारदार विद्यार्थ्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे विजय देवणे आणि बाबा इंदुलकर यांनी हे निवेदन दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.