Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Politic's : सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी शंभूराज देसाईंच्या ‘पालकमंत्रिपदाचा’ गेम होणार? गोरेंचं मुख्यमंत्र्यांकडे ‘शिवेंद्रराजेंसाठी’ लॉबिंग

Jaykumar Gore Statement Satara Guardian Minister : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस वाढली आहे. जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 17 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमध्येच पुन्हा एकदा चुरस दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा नव्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सोलापूर शहरातील एका पतसंस्थेच्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकत्र आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना गोरे यांनी ‘सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे, अशी आपली इच्छा आहे. तशी भावना आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलूनही दाखवली आहे,’ असे म्हटले आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आपण चांगले मित्र आहोत. दोघांनी मिळून जिल्ह्याचे पालकत्व सांभाळण्यास हरकत नाही. सातारा जिल्ह्याला एकाच वेळी दोन महत्त्वाची खाती असलेले मंत्री मिळणे, ही मोठी राजकीय ताकद ठरू शकते, असेही गोरे यांनी नमूद केले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे लातूरचे, जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूरचे आणि शंभूराज देसाई यांच्याकडे साताऱ्याचे पालकमंत्रिपद आहे, त्यामुळे गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवलेली भावना महत्वपूर्ण ठरते. त्यावर काय निर्णय होतो, याकडेही पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीमधील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी-शिवसेना असा वाद झाला होता. त्या वादाची पार्श्वभूमी गोरे यांच्या विधानाला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सध्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. मात्र, गोरे यांनी देसाई यांचे पालकमंत्रिपद बदलण्याची थेट मागणी केलेली नसली, तरी त्यांच्या वक्तव्यामुळे पालकमंत्रिपदाच्या बदलाची चर्चा पुन्हा रंगली आहे. त्याचबरोबर जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यातील सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वादाचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे. सोसायट्यांचे ठराव घेताना अनेक घडामोडी घडल्या आहेत, त्यामुळे अगोदरच राजकीय वातावरण तापले आहे. त्यात गोरे यांच्या विधानामुळे आणखी भर पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT