Baban Shinde - Sanjay Kokate
Baban Shinde - Sanjay Kokate Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संघर्ष चिघळणार! राष्ट्रवादी आमदाराच्या ईडी चौकशीसाठी शिवसेनेनेच केली होती तक्रार

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : महाविकास आघाडीच्या नेत्यांमागील केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा कायम आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. आमदार शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे जे जिल्हा दूध संघाचे चेअरमन देखील आहेत, त्यांची ईडीकडून चौकशी झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यासह विविध विषयात ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती आहे.

याबाबत आमदार शिंदे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र बबनराव शिंदे यांना ईडीने बजावलेल्या दोन समन्सचे फोटो माध्यमांच्या हाती सापडले आहेत. त्यामुळे मागील ३ महिन्यांपासून ही चौकशी सुरु असण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यासह विविध विषयात ईडीकडून चौकशी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे संपूर्ण प्रकरण ५०० कोटींच्या घरात जात असल्याचीही माहिती आहे.

मात्र या प्रकरणातील आता एक अत्यंत धक्कादायक आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष चिघळवणारी माहिती समोर आली आहे. आमदार शिंदे यांच्या मागे ईडी चौकशी लागण्यासाठी शिवसेनेनेच तक्रार अन् पाठपुरावा केला होता, अशी प्राथमिक माहिती आहे. माढा तालुक्यातील उपळाई येथील नागेश कदम यांनी सुरुवातीला आमदार शिंदेंच्या विरोधात एका सूतगिरणी खरेदी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ईडी, सेबी, आयकर विभाग अशा विविध ठिकाणी तक्रारी दिल्या होत्या.

त्यानंतर माढा तालुक्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी देखील आमदार शिंदे यांच्या विरोधात साखर कारखान्यातील ५०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात तक्रारी दाखल केल्या. कोकाटे केवळ तक्रार दाखल करुन थांबले नाहीत, तर या तक्रारीचा पाठपुरावाही त्यांनी केला. त्यानंतरच आमदार शिंदे यांना ईडीकडून नोटीस मिळून त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आमदार शिंदे आणि त्यांचे पुत्र यांची ईडी कडून जबाब नोंदवण्याचे काम करण्यात आले असून आता ईडीच्या कारवाईला सुरुवात होईल असेही संजय कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT