Shivsena Mahaadhiveshan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena Mahaadhiveshan : जावयामुळे सासऱ्यांची अडचण; महाअधिवेशनात शहाजीबापूंचा फोटो गायब...

Rahul Gadkar

Kolhapur News : शिवसेना एकसंध होती, त्यावेळी कोल्हापूर उत्तर शहराध्यक्ष म्हणून रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आली होती. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी ठाकरे सोबत राहण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण घडामोडीनंतर रविकिरण इंगवले यांनी वारंवार क्षीरसागर यांच्या विरोधात भूमिका घेतली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी सातत्याने राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच इंगवले यांना मध्यंतरी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची नोटीस काढण्यात आली होती. अशावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले होते. शहाजीबापू हे इंगवले यांचे चुलत सासरे म्हणून सांगितले जातात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहाजीबापूंच्या मध्यस्थीनंतर इंगवले यांच्याकडून हा प्रकार कमी होईल असे सांगण्यात येत होते. मात्र, तसे न घडता त्यांनी पुन्हा एकदा क्षीरसागर यांना निशाण्यावर ठेवले आहे. जावई मतदारसंघात या ना त्या कारणावरून त्रास देत असून, त्याला आवर घालण्याची मागणी सासऱ्याकडे करूनही त्यात फरक पडलेला नाही. त्याचा फटका आता सासऱ्यांनाही बसू लागला की काय? अशी चर्चा अधिवेशनाच्या ठिकाणी आहे.

कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसेनेचे मंत्री, आमदार, सचिव, युवासेना प्रमुख यांचे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी लावला आहे. या फलकावर शहाजीबापू पाटील यांचा फोटो नाही. शिवसेनेच्या महाअधिवेशनाची पूर्ण जबाबदारी क्षीरसागर यांच्याकडे आहे, पण या फलकावर शहाजीबापू पाटील यांचा फोटो नसल्याने आश्चर्य व्यक्त केले. मात्र, क्षीरसागर यांनी स्वागतपर फ्लेक्स उभा करताना त्यांना मुद्दाम वगळल्याची चर्चा आहे.

शहाजीबापूंचा विसर...

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते शहाजीबापू पाटील हे सर्वांनाच परिचित आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ज्यावेळी शिंदे गट गुहाहाटीला गेला. त्यावेळी शहाजीबापूंच्या 'काय डोंगर, काय झाडी' या भाषणाने गुहाहाटीचा दौरा गाजला होता. अखेर त्याच शहाजीबापूंचा शिवसेनेच्या शिंदे गटाला विसर पडला की काय? अशी चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. निमित्त होतं ते शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे. कारण याच अधिवेशनाच्या पोस्टरवर शहाजीबापूंचा फोटो गायब आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT